सांगली : जिल्ह्यात 2852 लोक ‘शस्त्रसज्ज!’ | पुढारी

सांगली : जिल्ह्यात 2852 लोक ‘शस्त्रसज्ज!’

सांगली : संजय खंबाळे

वाढती गुन्हेगारी आणि कमरेला पिस्तूल लावून वावरणे आजमितीस फॅशन झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पिस्तूल वापराच्या परवान्यासाठी अनेकांची धडपड सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यासाठी आलेल्या मागणीवरून ते दिसते. जिल्ह्यात सध्या स्वसंरक्षणासाठी सुमारे 2 हजार 852 जणांनी शस्त्राचा परवाना घेतला आहे.

पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच लोकांकडे शस्त्रांचा परवाना होता. मात्र गेल्या काही वर्षांत यामध्ये वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 825 जणांनी आत्मसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगल्या आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही सहभाग आहे. पिस्तुलाचा परवाना हा स्वसंरक्षण, स्पोर्टस्मॅन आणि शेतीचे संरक्षण, या तीन कारणांसाठीच देण्यात येतो. यापूर्वी परवान्यासाठी अर्ज करणार्‍यांची संख्या मर्यादित होती.

मात्र आजच्या काळात पिस्तूल असणे प्रतिष्ठेचे मानले जाते. वाढत्या गुन्हेगारीमुळे अनेकांना असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे पिस्तुलाच्या परवान्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. काहीजण यासाठी आपले राजकीय वजन वापरत असल्याचीही चर्चा आहे. परवाना काढून देतो म्हणून काही एजंट लोकांकडून पैसे उकळत असल्याचे सांगितले जाते.

परवाना मिळविण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र, पोलिस पाटील, तलाठी दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र, अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच स्थानिक पोलिस स्टेशनपासून ते पोलिस मुख्यालय यांच्यामार्फत पडताळणी केली जाते. त्यानंतर मागणी करणार्‍याला बोलावून विचारपूस करण्यात येते. परवान्याची मागणी करणार्‍याच्या जीवितास खरेच कोणाकडून धोका आहे का, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का, अशा विविध बाजूंनी पार्श्वभूमी पाहण्यात येते. मागणीचे कारण योग्य असल्याची खात्री झाली तरच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवाना देण्यात येतो, अन्यथा तो अर्ज नाकारला जातो. परवाना दिल्यानंतर सांगलीत असणार्‍या चार वितरकांकडूनच पिस्तूल घ्यावी लागते.

पिस्तुलाच्या परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेल्या वर्षी 40 जणांनी अर्ज केले होते. यातील काही मोजक्याच जणांना परवाना देण्यात आला आहे. आपल्याकडे पिस्तूल आहे, हे दाखविण्यासाठी अनेकजण कमरेला पिस्तूल लावून आज राजकीय, सामाजिक कार्यक्रमात वावरत आहेत. मात्र त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये धास्ती निर्माण होते आहे. त्यामुळे पिस्तुलाचे प्रदर्शन करणे योग्य आहे का, असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात पोलिसांकडून दोन वर्षांत 35 पिस्तुले जप्त

जिल्ह्यात काहीजण दहशत निर्माण करण्यासाठी अवैधरीत्या कमरेला पिस्तूल लावून वावरत आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात अवैधरीत्या गावठी कट्टा, देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 23 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 28 पिस्तुले आणि 32 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांत 7 जणांना अटक करून त्यांच्याकडून 7 पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेेत. अवैधरीत्या पिस्तूल बाळगणार्‍यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकांमार्फत अवैध बंदूकधारकांचा शोध घेऊन कारवाईचा बार उडवण्याची मागणी होत आहे.

Back to top button