IND vs SL : सामना श्रीलंकेशी, तयारी ‘वर्ल्डकप’ची | पुढारी

IND vs SL : सामना श्रीलंकेशी, तयारी ‘वर्ल्डकप’ची

लखनौ ; वृत्तसंस्था : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या (गुरुवारी) येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. लढत श्रीलंकेशी; तयारी वर्ल्डकपची, असे या सामन्याचे स्वरूप असेल. ऑस्ट्रेलियात होणार्‍या आगामी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी टीम इंडियात स्थान मिळविण्यासाठी दावेदार खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे.

यामुळे टीम इंडिया या मालिकेत अनेक पर्याय आजमावण्यास मागेपुढे पाहणार नाही. या मालिकेचा विजयाचा प्रबळ दावेदार अर्थात रोहित ब्रिगेडलाच मानले जात आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) या मालिकेत आगामी वर्ल्डकप नजरेसमोर ठेवून भारतीय संघ व्यवस्थापन जास्तीत जास्त खेळाडूंची चाचपणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. विराट कोहली, ऋषभ पंत, के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत आगामी तीन सामन्यांत निश्‍चितपणे इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांसारख्या प्रतिभावान खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. तर, कोहलीच्या गैरहजेरीत श्रेयस अय्यरलाही जास्त षटके फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारून मधल्या फळीतील आपले स्थान निश्‍चित करण्याची संधी मिळणार आहे.

ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यात अपयशी ठरले होते. यामुळे या अपयशाची भरपाई ते श्रीलंकेविरुद्ध करण्यास उत्सुक असतील. तसेच सूर्यकुमार यादव व दीपक चहर जखमी झाल्याने वेंकटेश अय्यरवरील जबाबदारी वाढली आहे.

संजू सॅमसनला संधी मिळाली असली त्याला अंतिम एकादशमध्ये कोठे स्थान मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध रवी बिश्‍नोईने चांगली कामगिरी केली आहे. भुवनेश्‍वर व मोहम्मद सिराज यांच्यासोबत उपकर्णधार जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे आक्रमण सांभाळेल.

श्रीलंकेचा विचार करावयाचा झाल्यास या संघाला नुकतेच ऑस्ट्रेलियाकडून 1-4 असा दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या मालिकेत श्रीलंकन फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. भारतातील फिरकीस अनुकूल खेळपट्टीवर आपले फलंदाज चांगली कामगिरी करतील, असा विश्‍वास कर्णधार दासून शनाका याला वाटत आहे. मात्र, या संघाला लेगस्पिनर हसरंगाची उणीव जाणवेल. हसरंगा सध्या कोरोना बाधित असून तो ऑस्ट्रेलियातच क्‍वारंटाईन असल्याने तो या मालिकेस मुकणार आहे.

संघ यातून निवडणार (IND vs SL)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, रवी बिश्‍नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्‍वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

श्रीलंका : दासून शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसाल मेंडिस, चरित असलंका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, दनुष्का गुणथिलका, कामिल मिशारा, जनीथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमिरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, शिरन फर्नांडो, महेश तीक्षाना, जेफरी वांडरसे, प्रवीण जयविक्रमा, आशियान डॅनियल.

सूर्यकुमार, चहर मालिकेतून आऊट

श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्‍का बसला आहे. दोन प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव व दीपक चहर हे दुखापतीच्या कारणास्तव मालिकेतूनच बाहेर पडले आहेत. सूर्यकुमारच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्‍चर आहे. कोहली व रिषभ पंत यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यातच फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमारही जखमी झाल्याने भारताच्या फलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या स्थानी वेंकटेश अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत स्नायू दुखापतीमुळे दीपक चहरही या मालिकेत खेळणार नाही. दुखापतीमुळे चहरला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांतही मैदानाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे.

Back to top button