

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : नवाब मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्यांनी जमिनीचा सौदा केला. मलिक यांनी दिलेल्या पैशाचा वापर अंडरवर्ल्डने देशाविरुद्ध केला. अशा देशद्रोह्यांशी तुम्ही सौदा केलाच कसा, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केला. या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मलिक राजीनामा देणार नसतील तर घटनात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगून देवेंंद्र फडणवीस म्हणाले, माझ्याकडे या प्रकरणात जी कागदपत्रे होती ती मी एनआयएला आणि ईडीला दिली. आता ईडीने तपास करून सर्व प्रकरण समोर आणले आहे.
ते म्हणाले, टेरर फंडिंग होत असेल तर कुठल्याही राजकीय पक्षाने त्याचा निषेध केला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. मात्र महाविकास आघाडी जर नवाब मलिक यांचे समर्थन करणार असेल तर त्याचा देशात अतिशय चुकीचा संदेश जाईल. ईडीने सर्वांचे जबाब घेतले आहेत.
त्यातून मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन सिध्द झाले आहे. मंत्री नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून घेतली आहे. त्यातला एक दाऊदची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर आहे. जमिनीच्या मूळ मालकांनी आपल्याला पैसे मिळालेले नाहीत हे चौकशीत सांगितले आहे.
ज्या ठिकाणी हे सौदे झाले त्या ठिकाणी हसीना पारकर येत होती, असे साक्षीपुराव्यातून समोर आले आहे. हसीना पारकरला 55 लाख रुपये दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले.