सांगली : धूमस्टाईल टोळीचा धुमाकूळ; महिलेचे गंठण हिसडा मारून पळवले | पुढारी

सांगली : धूमस्टाईल टोळीचा धुमाकूळ; महिलेचे गंठण हिसडा मारून पळवले

सांगली : पुढारी वृत्तसेवा : शहरात दुचाकीवरून येऊन धूमस्टाईलने दागिने पळवणार्‍या चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. कॉलेज कॉर्नर परिसरात दुर्गामाता मंदिरामागे फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्याने पळवले. किर्तीकुमार पुरूषोत्तम पटेल (वय 53, रतनशीनगर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, किर्तीकुमार पटेल रतनशीनगरमध्ये राहतात. त्यांची सून धारा दर्शित पटेल व मुलगी विधी पटेल या दोघी रात्री चालत निघाल्या होत्या. दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागून जात असताना सर्किट हाऊसच्या बाजूने टोपी घातलेला दुचाकीस्वार जवळ आला.

त्याने काही कळण्यापूर्वी धारा पटेल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तोडले. त्यानंतर दुर्गामाता मंदिराच्या बाजूने दुचाकीवरून बायपास रस्त्याकडे तो अंधारात पळाला. पटेल यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धूमस्टाईल टोळीचे पोलिसांसमोर आव्हान

शहरात महिनाभरात धूमस्टाईलने दागिने पळवण्याचे वाढले आहेत. त्याशिवाय धमकावणे, खुनी हल्ला करून लूटमारीचेही प्रकार घडले आहेत. त्यातील अनेक प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. या संशयितांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button