तासगाव : पुढारी वृत्तसेवा : "आमच्या बैलगाडीच्या पुढे तुझी बैलगाडी का पळवलीस", असे विचारत रावसाहेब शिवाजी पाटील (वय 48, रा. भांबर्डे, ता. खानापूर) यांना नऊ जणांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. या प्रकरणी रावसाहेब यांनी तासगाव पोलिसात नऊ जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
सदा तामखडे, सागर तामखडे, सचिन तामखडे, पाडा तामखडे, संदेश तामखडे व अनोळखी चार (सर्व रा. भिकवडी बुद्रूक, ता. खानापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी : फिर्यादी व संशयित बैलगाड्या घेऊन मायक्का चिंचणी यात्रेला गेले होते. सोमवारी गावाकडे परतत होते. लिंब व आळतेच्या दरम्यान रावसाहेब यांनी बैलगाडी जोरात पळवली. आपल्या बैलगाडीच्या पुढे त्याने बैलगाडी काढल्याचा संशयितांना राग आला. त्यांनी रावसाहेब यांचा पाठलाग करून गज, काठी व चाबकाने बेदम मारून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.