बुद्धिबळ : विश्वविजेत्याचे वारसदार!

बुद्धिबळ : विश्वविजेत्याचे वारसदार!
Published on
Updated on

विदित, अर्जुन, प्रग्याननंदा यांच्यासह अनेक युवा बुद्धिबळ खेळाडू जागतिक स्तरावर भारताची शान उंचावत आहेत. कोरोनाच्या महामारीतही ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण आणि सराव करण्याची संधी या खेळाडूंनी घेतली आहे; तसेच ऑनलाईन स्पर्धांमध्येही भाग घेत त्यामध्ये देदीप्यमान यश त्यांनी मिळविले आहे.

आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रात बरेच वेळेला असे दिसून येते की, जगात श्रेष्ठ कामगिरी करणारा एखादा खेळाडू त्या खेळामध्ये युग निर्माण करतो. त्याच्या विश्वविजेतेपदाचा वारसा कोण पुढे चालवणार, हा प्रश्न असतो. मात्र बुद्धिबळामध्ये पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्‍या विश्वनाथन आनंद यांच्या पावलावर पाऊल ठेवीत देशाचा नावलौकिक कायम राखण्याची क्षमता विदित गुजराथी, अर्जुन एरीगेसी, रमेशबाबू प्रग्याननंदा इत्यादी युवा खेळाडूंमध्ये आहे हे सिद्ध होऊ लागले आहे.

बुद्धिबळ क्षेत्रात टाटा स्टील मास्टर्स स्पर्धा ही विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानली जाते. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी विदित व प्रग्याननंदा यांना मिळाली. या स्पर्धेमध्ये विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याच्यासह जगातील श्रेष्ठ खेळाडू भाग येत असल्यामुळे स्पर्धेतील प्रत्येक लढत रोमांचकारी आणि उत्कंठापूर्ण असते. या स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये भारतीय खेळाडूंना स्थान मिळविता आले नाही तरीही, त्यांनी या स्पर्धेत नोंदवलेले निकाल निश्चितच त्यांच्या भावी यशाची झलक मानली जाते.

या स्पर्धेबरोबरच टाटा स्टील चॅलेंजर स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे टाटा मास्टर्स स्पर्धेसाठी खेळाडूंना संधी मिळते. या चॅलेंजर स्पर्धेत 18 वर्षीय खेळाडू अर्जुन याने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपद पटकावले, त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या टाटा मास्टर्स स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

बुद्धिबळ मध्ये अव्वल दर्जाचे यश मिळण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही. आनंद याने वयाचे अर्धशतक ओलांडले तरीही या खेळातील त्याचे कौशल्य अजिबात कमी झालेले नाही. भारतासाठी बुद्धिबळाचा युगकर्ता मानला जाणार्‍या या खेळाडूने या खेळाच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विश्वविजेतेपद मिळवले आहे. आनंदचे कौशल्य संपले अशी टीका करणार्‍या टीकाकारांना त्याने चाळीशीनंतरही डॉर्टमुंड चषकसारख्या काही स्पर्धांमध्ये अजिंक्यपद मिळवित चोख उत्तर दिले होते.

ही कामगिरी करीत असतानाच त्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू निर्माण करण्यात मोठा वाटा उचलला आहे. वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच बुद्धिबळ या स्पध्रेत करिअर करण्याच्या ध्येयाने सराव करणार्‍या अनेक मुलामुलींनी वेगवेगळ्या वयोगटांमध्ये जागतिक विजेतेपदावर आपली मोहर नोंदवली आहे. विदित, प्रग्याननंदा, अर्जुन हे याच मालिकेतील नैपुण्यवान युवा खेळाडू आहेत.

नाशिकचा 28 वर्षीय खेळाडू विदित हा फिडे मानांकनात आनंदच्या खालोखाल भारताचा दुसरा खेळाडू आहे. सध्या त्याचे 2727 मानांकन गुण आहेत. आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पंधराशेपेक्षा जास्त डाव खेळले आहेत, त्यापैकी केवळ 18 टक्के डाव त्याने गमावले आहेत. व्हॅसिली इव्हानचूक, मॅक्झिम व्हॅचिएर लाग्रेव्ह इत्यादी अव्वल दर्जाच्या खेळाडूंवर त्याने मात केली आहे, तर विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याच्याविरुद्ध प्रत्येक डावात त्याने बरोबरी घेतली आहे.

त्याखेरीज लिवॉन आरोनियन, अनीष गिरी, सर्जी कर्याकिन इत्यादी खेळाडूंविरुद्धचे काही डाव बरोबरीत ठेवीत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुप देशमुख, अभिजित कुंटे, रोक्तिम बंडोपाध्याय, लन ग्रीनफिल्ड इत्यादी मार्गदर्शकांच्या तालमीत तयार झालेला विदित हा विविध मोहरांच्या कल्पक व्यूहरचनेबाबत माहीर खेळाडू मानला जातो.

आजपर्यंतच्या कारकिर्दीत त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वीडन खुल्या स्पर्धेत त्याने अनेक सनसनाटी विजय नोंदवीत अजिंक्यपद पटकावले होते. 2019 मध्ये बिएल चषक या मानांकित स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाच्या खेळाडूंपेक्षा अडीच गुणांच्या फरकाने त्याने विजेतेपद पटकाविले होते. त्याच वर्षी फिडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली होती. दोन वर्षांपूर्वी फिडे ऑनलाईन ऑलिंपियाड स्पर्धेत भारताने सनसनाटी विजेतेपद मिळवले होते. त्यामध्ये विदितच्या नेतृत्वाचा मोठा वाटा होता.

प्रग्याननंदा हादेखील उज्ज्वल भवितव्य असलेला खेळाडू मानला जातो. वयाच्या सातव्या वर्षी त्याने आठ वर्षांखालील गटाची जागतिक स्पर्धा जिंकली आणि फिडे मास्टर किताब पटकाविला. हे विजेतेपद म्हणजे चमत्कार नव्हता हे सिद्ध करीत त्याने दहा वर्षांखालील गटातही विश्वविजेतेपद मिळविले आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर हा किताब मिळविणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे, तर ग्रँड मास्टर हा किताब त्याने बाराव्या वर्षीच मिळविला. वयाच्या चौदाव्या वर्षीच त्याने 2600 फिडे मानांकन गुणांचा टप्पा ओलांडला आहे. अठरा वर्षांखालील गटाचाही तो विश्वविजेता खेळाडू आहे. डेन्मार्क चषक खुली स्पर्धा तसेच पोल्गार चषक मालिकेतील पहिली स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये त्याने अजिंक्यपदावर नाव कोरले आहे.

या सोळावर्षीय खेळाडूने कारकिर्दीत आतापर्यंत वेस्ली सो, जॉन क्रिझ्टोफ ड्यूड, तैमूर रादजाबोव्ह, कर्याकिन, योहान सेबास्टियन क्रिस्तियान्सन, नील्स ग्रँडेलिउस, आंद्रे एसिपेन्को, विदित इत्यादी खेळाडूंवर खळबळजनक विजय नोंदविला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा मास्टर्स स्पर्धेत कार्लसन याला बरोबरीत रोखून अनपेक्षित निकाल नोंदविला होता. अतिशय लहान खेळाडू असला तरीही कोणतेही मानसिक दडपण न घेता आत्मविश्वासाने तो खेळतो आणि बलाढ्य खेळाडूला शेवटपर्यंत झुंजविण्याबाबत तो ख्यातनाम खेळाडू मानला जातो.

आनंदप्रमाणेच जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक उंचावण्याचेच ध्येय उराशी बाळगून अर्जुन एरीगेसी याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्वासक वाटचाल केली आहे. अठरा वर्षाच्या या खेळाडूने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांमध्ये झेप घेतली आहे. त्यामध्ये त्याने आपल्यापेक्षा मानांकनांमध्ये वरचढ असलेल्या खेळाडूंना नमविले आहे. एकाच वर्षी 'आंतरराष्ट्रीय मास्टर' व 'ग्रँड मास्टर' हे दोन्ही किताब मिळवणार्‍या या खेळाडूने 2700 फिडे मानांकनाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.

प्रतिस्पर्धी खेळाडूच्या शैलीचा बारकाईने अभ्यास करून, त्याप्रमाणे आपल्या रणनीतीत बदल करण्याबाबत तो चतुरस्र खेळाडू मानला जातो. विदित, अर्जुन, प्रग्याननंदा यांच्यासह अनेक युवा खेळाडू जागतिक स्तरावर भारताची शान उंचावत आहेत. कोरोनाच्या महामारीतही ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण आणि सराव करण्याची संधी या खेळाडूंनी घेतली आहे; तसेच ऑनलाईन स्पर्धांमध्येही भाग घेत त्यामध्ये देदीप्यमान यश त्यांनी मिळविले आहे. खर्‍या अर्थाने आजचे हे युवा खेळाडू आनंदचे वारसदार आहेत.

मिलिंद ढमढेरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news