

सांगली : पुढारी वृत्तसेवा
भुयारी ड्रेनेज योजना टप्पा क्रमांक 2 अंतर्गत प्रभाग क्रमांक 18 मधील तीस टक्के काम अपूर्ण आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक पंधरा, सतरा, अठरा आणि एकोणीसमधील ड्रेनेजलाईन कार्यान्वित झाली नाही. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही या योजनेचा लाभ होऊ शकलेला नाही. नऊ वर्षे होत आली तरी ही योजना अपूर्ण आहे. महापालिकेला ठेकेदार जुमानेना झाला आहे, असे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सांगितले.
भोसले म्हणाले, गेल्या 9 वर्षात भुयारी गटर योजना टप्पा क्रमांक 2 मधील प्रभागातील 60 ते 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्याशिवाय ही भुयारी गटर योजना कार्यान्वित होऊ शकत नाही. काम पूर्ण करण्यास संबंधित ठेकेदाराकडून दिरंगाई होत आहे. योजना वेळेत कार्यान्वीत न झाल्याने झालेल्या कामावरील निधी वाया जाण्याची शक्यता आहे. या योजनेच्या उर्वरित कामावर या योजनेतील 100 फुटी दक्षिणेकडील भागातील ड्रेनेज योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
मोहिते मळा परिसरातील ड्रेनेज ट्रंक मेन लाईन, विठ्ठलनगर परिसरतील ड्रेनेज ट्रंक मेन लाईन, चिकुची बाग ते ए. बी. पाटील स्कूलजवळील पंप हाऊसपर्यंत ड्रेनेज ट्रंक मेन लाईन, तक्षशिला रोड ते पंप हाऊसपर्यंत ड्रेनेज ट्रंक मेन लाईन, शामरावनगर ते पंप हाऊसपर्यंत ड्रेनेज ट्रंक मेन लाईनचे काम पूर्ण करणे, पंपहाऊसवरील उर्वरित काम पूर्ण करणे गरजेचे आहे.
नगरसेवक अभिजित भोसले म्हणाले, ड्रेनेज योजनेच्या रखडलेल्या कामाकडे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांचे लक्ष वेधले. दि. 7 फेब्रुवारीपासून योजनेची कामे तत्काळ सुरू करावीत, अशी नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी ड्रेनेज विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. मात्र अद्यापही काम सुरू झालेले नाही. नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा. काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.