सांगली : आंतरराज्यीय टोळीचा विटा पोलीसांकडून पर्दाफाश | पुढारी

सांगली : आंतरराज्यीय टोळीचा विटा पोलीसांकडून पर्दाफाश

विटा,पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवरून घरफोडी करणारी आंतरराज्यीय चोरट्यांची टोळी पकडण्यात विटा पोलिसांना यश आले आहे. ही टोळी पुणे जिल्ह्यातील कुसेगाव (ता.दौंड) येथील आहे. आतापर्यंत या चोरट्यांकडून तीन घरफोड्यांमधील एकूण पावणे १४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी योगेश रमेश नानावत (वय३७,धंदा हातभट्टी ) या चोरट्यास अटक केली असून इतर आदित्य बलराम शेखावत, करण भगत शेखावत आणि अरुण केरा राठोड तिघे पळून गेले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुक्यात चोऱ्या आणि घरफोड्यांच्या प्रकारात वाढ झाली होती. या बाबत विटा पोलिस सातर्क राहून गस्त वाढवली होती. या पार्श्वभूमीवर 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तालुक्यातील चिखलहोळ येथील शिक्षक अर्जुन गिरी यांच्यात मोठी चोरी झाली. या चोरीचा तपास सुरू असताना संशयित योगेश नानावत हा विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. बी. कोळेकर यांच्या पथकाला गस्त घालत असताना संशयितरित्या फिरत असताना सापडला.

त्‍यानंतर त्‍याला पकडून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याच्या बरोबर त्याचे साथीदार आदित्य शेखावत, करण शेखावत आणि अरुण राठोड या ठिकाणी रेसर बाईक गाड्यांवर इतरत्र जाऊन घरफोड्या केल्या आहेत अशी कबुली दिली. यावेळी योगेश नानावत याने त्याच्या या साथीदारांबरोबर चिखलहोळ बरोबरच रेणावी येथील अनिता गुजले यांच्या घरात २७ डिसेंबर २०२१ रोजी घरफोडी केली होती आणि वाळूज येथील राजेंद्र मुरलीधर बाबर यांच्या घरात १ जुलै २०२१ रोजी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे.

याप्रकरणी या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन रेसर बाईक (पल्सर गाडी नंबर एम एच१२, आर यु. २४६८ आणि निळ्या रंगाची यामाहा गाडी नंबर एम एच १२ टी डब्ल्यू ५००४) ही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. याशिवाय या चोरट्यांकडून एकूण २२८ ग्रॅम सोने, २ हजार ०४० ग्रॅम चांदीही हस्तगत करण्यात आलेली आहे. त्यामुळे रेसर बाईक अर्थात दुचाकीवरून घरफोड्या करून पळून जाणारी पुणे जिल्ह्यातील आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे, या संशयितांच्याकडून आणखीही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button