सांगली : राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची जुळवाजुळव | पुढारी

सांगली : राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडीची जुळवाजुळव

इस्लामपूर : मारूती पाटील

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पुन्हा सर्वपक्षीय विकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, विरोधकांच्याकडे सध्या तरी एकमुखी नेतृत्वाची उणीव आहे. त्यामुळे आघाडीची मोट कोणाच्या नेतृत्वाखाली बांधली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महिन्याभरात जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे तालुक्यात राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, नगरपालिका-महानगरपालिका निवडणुकांप्रमाणे याही निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या निवडणुकीत 22 जागांपैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. या निवडणुकीत विकास आघाडीला 7, काँग्रेसला 1 तर शिराळा मतदारसंघातील 48 गावातील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला दोन मिळाल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या 11 पैकी 6 मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. येलूर, कामेरी, पेठ मतदारसंघात विकास आघाडीने तर बोरगावमध्ये काँग्रेस व वाळव्यात हुतात्मा गटाने बाजी मारली होती. या निवडणूक आघाडीतील बिघाडीने काही मतदारसंघात विकास आघाडीला तर बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला फटका बसला होता. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने तालुक्यात पुन्हा राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे.

नेते मंडळींनी संपर्क दौरे, विकासकामांची उद्घाटने, पक्ष प्रवेशांचे कार्यक्रम या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्याविरोधात तालुक्यात विकास आघाडी करण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, स्व. नानासाहेब महाडिक, माजी खा. राजू शेट्टी, माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, हुतात्मा गटाचे वैभव नायकवडी, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, अभिजित पाटील, सी.बी. पाटील आदी नेतेमंडळींचा पुढाकार असायचा. मात्र, गत निवडणुकीत काँग्रेस आघाडीपासून दूर होती, तर शिवसेनेने पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली होती.

आता वनश्री नानासाहेब महाडिक यांचे निधन झाल्याने तसेच विधानसभा निवडणुकीपासून शिवाजीराव नाईक, वैभव नायकवडी हे राजकारणापासून काहीसे अलिप्त असल्याने तर राजू शेट्टी हे महाविकास आघाडीकडे गेल्याने आता राष्ट्रवादी पक्षाविरोधात विकास आघाडीची मोट बांधण्यासाठी पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते राहुल महाडिक, आ. सदाभाऊ खोत, सी.बी. पाटील, गौरव नायकवडी, निशिकांत पाटील, अभिजित पाटील आदी नेत्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

आघाडीची पुन्हा मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी काँगे्रस व शिवसेना पक्षाची भूमिका या निवडणुकीत काय असणार, यावरही विकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे. भाजपचे बहुतांश नेते सध्या तरी विकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याच्या मनःस्थितीत आहेत.

जि.प. चा मतदारसंघ वाढणार…

मतदारसंघ पुनर्रचनेत वाळवा तालुक्यात जि.प. चा एक मतदारसंघ व पंचायत समितीचे दोन गण वाढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या पुनर्रचनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

Back to top button