सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचाही उडणार धुरळा | पुढारी

सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीचाही उडणार धुरळा

खेड : अजय कदम

यंदाचे वर्ष निवडणुकीच्या रणधुमाळीचे ठरणार असून नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या याबरोबर सातारा तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचीही तयारी सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून प्रभागाची संयुक्त स्थळ पहाणी करून त्याच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. दि. 25 मार्च रोजी ही प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या व 17 सदस्य संख्या असलेल्या खेड ग्रामपंचायतीचा यात समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत राज्यातील 1 हजार 849 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या नाहीत. या मध्ये सातारा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यातील 6 हजार 747 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या दोन्ही वर्षातील ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेसाठी 29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेला कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने राबवल्याबद्दल दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी राज्य निवडणूक आयोगाने तो रद्द केला.

राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा दि. 27 जानेवारी रोजी नव्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून प्रभाग पाडून त्याच्या सीमा निश्चित केल्या. आता या प्रारूप प्रभागांची दि. 8 फेब्रुवारीपर्यंत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून तपासणी पूर्ण करावी लागणार आहे.

14 फेब्रुवारीपर्यंत हे प्रस्ताव उपविभागीय अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर केले जातील. त्या प्रस्तावांची तपासणी करून आवश्यक असल्यास दुरुस्ती करून जिल्हाधिकारी दि. 18 फेब्रुवारीपर्यंत मान्यता देतील. यानंतर दि. 23 रोजी तहसीलदार प्रारूप प्रभाग रचना जाहीर करतील.

या प्रारूप प्रभाग रचनेवर दि. 25 फेब्रुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत हरकती व सुचना स्वीकारल्या जाणार आहेत.दि. 15 मार्चपर्यंत प्रांताधिकार्‍यांकडे या हरकतीवर सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर दि 21 मार्चपर्यंत हे सर्व प्रस्ताव प्रांताधिकारी अंतीम मान्यतेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार आहेत. यानंतर दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी सर्व प्रभाग अंतिम करणार आहेत.

सातारा शहरालगतच्या शाहूपुरी, विलासपूर, दरेखुर्द या ग्रामपंचायतीसह खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेकडील भाग नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला. मोठ्या व 17 सदस्य संख्या असलेल्या खेड ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षांपासून निवडणूक रखडली होती. तसेच संभाजीनगर याही ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. तर पाटखळ ग्रामपंचायतीत चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाल्याने निवडणूक कार्यक्रम रद्द झाला होता.

या सर्व ग्रामपंचायतींची नव्याने प्रभाग रचना होणार आहे. नव्याने झालेल्या सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीत शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुर्वेकडील असलेला स.नं. 42 मधील भाग अद्यापही गोडोली त्रिशंकू भागामध्येच आहे. त्यामुळे महामार्गाच्या पुर्वेकडील सं.नं. 42 मध्ये असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, म्हावशे पेट्रोल पंप, जिव्हाळा, गंगोत्री, अपार्टमेंट, यशोदा शिक्षण संस्थेच्या विद्यालयानजीकचा परिसर, जुने अपेक्स हॉस्पिटल परिसर, देशमुखनगर, जुनी एमआयडीसी पोलीस चौकीच्या ओढ्याच्या हद्दीपलीकडील भाग लोकसंख्येच्या निकषानुसार खेड ग्रामपंचायतीच्या नव्याने होणार्‍या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

अनेक मोठ्या गावांचा समावेश….

सातारा तालुक्यात यावर्षी होणार्‍या ग्रामपंचायतीत मोठ्या गावांचा समावेश असून यामध्ये खेड, पाटखळ, आरफळ, संभाजीनगर, काशीळ, क्षेत्रमाहुली, देगाव, अपशिंगे, वडूथ, मर्ढे, चिंचणेर सं. निंब, गोजेगाव, खिंडवाडी, कोपर्डे, सोनगाव तर्फ सातारा, बोरखळ, मालगाव, कामेरी, जैतापूर, खोजेवाडी मत्यापूर या मोठ्या गावांचा समावेश आहे.

Back to top button