

हिंडलगा ; पुढारी वृत्तसेवा : पोलिस असल्याचे भासवत दोघा भामट्यांनी सोमवारी एका वृद्ध दांपत्याचे साडेचार तोळ्यांचे दागिने लांबवले. हे दांपत्य लग्नाला निघाले असताना त्यांना गणेशपूरजवळ अडवून त्यांचे लक्ष विचलित करून ही लूट करण्यात आली. (Belgaum crime)
सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. गणपत रामचंद्र पाटील (75, बेळगुंदीला लग्नाला निघाले होते. विजयनगर पंपावर त्यांनी पेट्रोल भरले. यानंतर अर्धा किलोमीटर पुढे गेले असता दोघेजण पाठीमागून दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी लावली.
तसेच आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी करत 'या रस्त्यावर कालच गांजा पकडला आहे. त्यामुळे वाहन तपासणी जोमात सुरू आहे. तुम्ही तुमच्या दुचाकीची डिक्की खोलून दाखवा', असे म्हणत एकाने त्यांच्याकडून चावी घेऊन डिक्की खोलली. डिक्कीत पाहिल्यासारखे करत त्यांनी कुठे चालला आहात, कशासाठी निघाला आहात, अशी प्रश्नांची सरबत्ती करत या दांपत्याला भंडावून सोडले.
काही वेळानंतर त्या दोघांनी या रस्त्याला चोरटे वाढल्याची माहिती आहेत. असे असताना तुम्ही इतके दागिने घालून कुठे चालला आहात? असा प्रश्न केला. या दांपत्याने लग्नाला चाललो आहोत, असे सांगितले.
मात्र या भामट्यांनी दागिने काढून डिक्कीत ठेवा, अशी सूचना केली. त्यानुसार सदर वृद्धेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, श्रीमंतहार व सोनसाखळी काढून भामट्यांच्या हातात दिली. त्यांनी ती रूमालात बांधून डिक्कीत ठेवल्याचे नाटक केले आणि दागिन्यांचा रूमाल स्वतःकडे ठेवत दुसराच रूमाल डिक्कीत ठेवला व भामटे निघून गेले.
काहीसे पुढे गेल्यानंतर लग्नाला जाण्यासाठी दागिने घालावेत म्हणून गणपत यांनी डिक्कीतील रूमाल काढला असता त्यामध्ये दगड बांधल्याचे दिसून आले. आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच या वृद्ध दांपत्याला धक्का बसला. त्यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत भामटे पसार झाले होते.
कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी तपास करीत आहेत. लग्नाला जात असल्याने काही दागिने आजच घातल्याचे फिर्यादी गणपत पाटील यांनी पोलिसांना सांगितले.
साध्या वेशात अशी अडवणूक झाली तर समोरील व्यक्ती खरोखरच पोलिस आहे की नाही, ही खात्री करून घेण्यासाठी न घाबरता त्याच्याकडे ओळखपत्र मागा, तो देत नसेल तर पोलिस ठाण्यात चला, आम्ही रस्त्यावर तुमच्याशी काहीही बोलणार नाही, असे ठणकावून सांगा. तरच तुमची फसवणूक टळेल, असे कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी आवाहन केले आहे.