सांगली : तरस शिकारप्रकरणी तरुणास अटक; व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरणाचा छडा - पुढारी

सांगली : तरस शिकारप्रकरणी तरुणास अटक; व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरणाचा छडा

जत ; पुढारी वृत्तसेवा 

बाज- अंकले रस्त्यावर बेळुंखी हद्दीत (दि.२१जानेवारी) रोजी तरस मृतावस्थेत आढळून आले होते. वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्‍यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता; परंतु चार दिवसांपूर्वी व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणाचा छडा लागला. या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षक अधिनियम अंतर्गत बापू उर्फ महादेव मनोहर चव्हाण (वय.२४) याला अटक केली.  न्‍यायालयाने त्‍याला तीन दिवसांची वन कोठडी दिली आहे. अन्य संशयिताचा शोध सुरू आहे.

सद्यस्थितीत पश्चिम भागात वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. पोल्ट्रीधारक मेलेल्या कोंबड्या उघड्यावर टाकत असल्याने या कोंबड्या कुत्री मानवी वसाहतीजवळ आणून टाकत आहेत. परिणामी या कोंबड्या खाण्यासाठी तरस मानवी वसाहतीमध्ये वावर करत आहे. या तरसाने एका वृद्ध महिलेवर व शेळीवर हल्ला केला होता. एका घोड्याचे शिंगरू देखील फस्त केले होते.दरम्यान (दि.२१ जानेवारी, शुक्रवारी ) रस्त्यावर तरस मृतावस्थेत आढळून आले होते.

वन विभागाने ठार झालेले तरस ताब्यात घेऊन त्‍याचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तपासाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक तपास गोपनीय ठेवला होता. सुरवातीस वाहनाच्या धडकेत तरस ठार झाला असल्याचा अंदाज होता; परंतु चार-पाच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नेमके कारण शोधून काढण्यास वाव मिळाला आहे. एक संशयित वन विभागाच्या ताब्यात असून अन्य संशयितास ताब्यात घेण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. वन विभागाने यासंदर्भात गोपनीयता ठेवली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक विजय माने, डॉ. अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील, वनरक्षक गणेश दुधाळ, प्रकाश गडदे, अप्पासाहेब नरुटे. विद्या घागरे, चंद्रकांत ढवळे या पथकाने केली आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button