सांगली : भिलवडीत राष्ट्रगीताने होते दिवसाची सुरुवात

सांगली : भिलवडीत राष्ट्रगीताने होते दिवसाची सुरुवात
Published on
Updated on

सांगली : स्वप्निल पाटील

राष्ट्रगीताने दिवसाची सुरुवात करणारे गाव जिल्ह्यात आहे. महापुरात पूर्णपणे पाण्याखाली जाणार्‍या 'भिलवडी' गावाने आता राज्यासमोर किंबहुना देशासमोर राष्ट्रगीताचा आदर्श घालून दिला आहे. सध्या सर्वत्र याची जोरदार चर्चा आहे.

जेमतेम पंधरा हजार लोकसंख्या असलेले हे गाव महापुरात चांगलेच चर्चेत असते. प्रत्येक वर्षी येणार्‍या महापुरामुळे गाव पूर्णत: पाण्याखाली जाते. सन 2019 अणि 2021 मध्ये आलेल्या महापुराने या गावाचे होत्याचे नव्हते केले होते. परंतु महापुरामुळे आलेली ती प्रसिद्धी पुसून एक आदर्श गाव म्हणून नावारुपास येण्यासाठी भिलवडीमधील व्यापारी संघटनेचे समन्वयक दीपक पाटील व त्यांच्या सहकार्यातून या राष्ट्रगीताच्या संकल्पनेचा उदय झाला आहे.

दीपक पाटील यांच्यासह महेश शेटे, सचिन तावडे, निसार इबुसे, बापू जगताप, अमोल वंडे, समीर कुलकर्णी यांनी पुढाकार घेत गावात दररोज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 'राष्ट्रगीत' वाजविले जाईल आणि गावातील दिवसाची सुरुवात केली जाईल, अशी भूमिका मांडली. ही संकल्पना गावकर्‍यांच्या देखील पसंत पडली. सरपंच सौ. सविता पाटील यांनी याला तत्काळ मंजुरी दिली आणि त्यांनतर आजपर्यंत या गावात ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

सकाळची कामे आटोपून गावातील काही वरिष्ठ मंडळी स्टँडजवळ जमतात. तेथेच एका इमारतीवर स्पीकर बसविण्यात आला आहे. रस्त्यावरून जाणारे-येणारे, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी यांचा देखील याच रस्त्यावर राबत असतो. त्यामुळे स्पिकरसाठी हीच जागा निश्चित करण्यात आली आहे.

दररोज सकाळी राष्ट्रगीत सुरू झाले की, अंगणात खेळणारी लहान मुले, घरकाम करणार्‍या महिला, शेतात काम करणारे मजूर हे सर्व आपापली कामे सोडून राष्ट्रगीतासाठी उभे राहतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. आता सार्‍यांच्याच अंगवळणी हे पडल्याचे दिसून येते.

दीपक पाटील यांनी सांगितले, लॉकडाऊनमध्ये सर्व व्यापार बंद होता. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी आम्ही सर्व व्यापारी एका ठिकाणी जमत होतो. बोलता-बोलता चर्चेतून हा विषय समोर आला. तो आम्ही गावासमोर मांडला आणि नंतर तो प्रत्यक्षात आला. आज या संकल्पनेला मोठे व्यापक स्वरुप प्राप्त झाले, याचा आम्हा गावकर्‍यांना सार्थ अभिमान वाटतो आहे.

ही संकल्पना देशात राबवावी : सरपंच

सरपंच सविता पाटील म्हणाल्या, गावातील लोकांमध्ये देशभक्ती रुजविण्यासाठी व्यापार्‍यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू केला आणि आता तो राज्यासह देशपातळीवर पोहोचला आहे. गावात दरररोज स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्तादिन असल्याचे वातावरण असते. तसा आदर्श इतर गावांनी देखील घ्यावा आणि राज्यातील प्रत्येक गावांसह देशात हा उपक्रम राबविला जावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news