lab Testing : ‘लॅब टेस्टिंग’ दरात घोटाळा | पुढारी

lab Testing : ‘लॅब टेस्टिंग’ दरात घोटाळा

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मिरजेतील रस्ता काँक्रिटीकरण व क्रॉस ड्रेन पाईपच्या कामासंदर्भातील ‘लॅब टेस्टिंग’च्या (प्रयोगशाळा चाचणी) दरातील घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. ‘लॅब टेस्टिंग’ दर 0.5 टक्के असताना 5 टक्क्यांपेक्षा अधिक दर आकारून रक्‍कम ठेकेदारांना दिली आहे.आयुक्‍त नितीन कापडणीस यांच्या सतर्कतेने हा घोटाळा निदर्शनास आला.

महापालिकेचे आर्थिक नुकसान, अपहारप्रकरणी शाखा अभियंता, लेखापरीक्षण अधिकारी आणि ठेकेदार यांना नोटीस बजावली आहे. खुलासा सादर न केल्यास अपहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा कापडणीस यांनी दिला आहे. कापडणीस यांनी महापालिकेच्या लेखाविभागाचा आढावा घेतला असता काही बिलांमध्ये अतिरिक्‍त लॅब चार्जेस देयके कंत्राटदारांनी महापालिकेकडे सादर केल्याचे आढळले. बर्‍याचशा बिलामध्ये ही जादाची लॅब चार्जेस प्रदान केल्याचेही दिसून आले. आयुक्‍तांनी हा प्रकार गांभिर्याने घेत मुख्य लेखाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविला. ‘लॅब टेस्टिंग’चे प्रत्यक्ष दर व ठेकेदारास दिली जात असलेली रक्कम यामुळे जादा रक्कम दिल्याने अनियमितता आढळून येत असल्याचा अहवाल मुख्य लेखाधिकारी सुशीलकुमार केंबळे यांनी सादर केला आहे.

प्रयोगशाळेने आकारलेल्या शुल्कपेक्षा दिली जादा रक्कम

मालगाव रोड स्वामी समर्थ कॉलनी रोड काँक्रिट करणे या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यामध्ये प्रयोगशाळा चाचणी व तांत्रिक लेखापरीक्षण अहवालासाठी चुकीच्या पद्धतीने 5 टक्क्यांपेक्षा जादा रकमेची तरतूद केल्याचे निदर्शनास आले. कामाचे बिल देण्यासाठी लेखा विभागाकडे सादर केलेल्या बिलात लॅब टेस्ट रिपोर्टसाठी प्रयोगशाळेकडून आकारण्यात आलेल्या शुल्कइतकेच म्हणजे 3 हजार 986 रुपये देणे आवश्यक होते. मात्र, या कामाच्या ठेकेदारास अंदाजपत्रकामधील लॅब टेस्ट रक्कम 15 हजार 300 रुपये दिले आहेत. 11 हजार 314 रुपये जादा दिले आहेत.

महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होऊन वित्तीय अनियमितता झाली आहे. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता डी. डी. पवार, लेखा परीक्षण अधिकारी अनिल चव्हाण, ठेकेदार महालिंग चिखली यांना नोटीस बजावली आहे. सात दिवसांत खुलासा न केल्यास आर्थिक अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे.मिरज वॉर्ड क्रमांक 5 मधील विविध ठिकाणी क्रॉस ड्रेन पाईप टाकणे या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना त्यामध्ये प्रयोगशाळा चाचणी व तांत्रिक लेखापरीक्षणासाठी चुकीच्या पद्धतीने 5 टक्क्यांपेक्षा अधिक रकमेची तरतूद केल्याचे निदर्शनास आले आहे. लॅब टेस्ट रिपोर्टसाठी प्रयोगशाळेकडून आकारलेल्या शुल्कइतके म्हणजे 1 हजार 416 रुपये ठेकेदारास देणे आवश्यक होते. तथापि ठेकेदारास अंदाजपत्रकामधील लॅब टेस्ट रक्कम 11 हजार रुपये दिले आहेत. ठेकेदारास 9 हजार 584 रुपये जादा दिले आहेत. याप्रकरणी कनिष्ठ अभियंता पवार, लेखापरीक्षण अधिकारी चव्हाण, ठेकेदार एफ. एस. मोमीन यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

दर 0.5 टक्के; दिले 5 टक्क्यांहून अधिक

नगरविकास विभागाच्या दि. 28 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार त्रयस्थ लेखापरीक्षणासाठी 1 टक्के रक्‍कम व लॅब टेस्टिंगसाठी 0.5 टक्के रकमेची तरतूद अंदाजपत्रकात करणे आवश्यक आहे. मिरजेतील दोन कामांमध्ये लॅब टेस्टिंगची आकारणी 5 टक्क्यांहून अधिक केली आहे. या दोन कामांमध्ये 20 हजार 898 रुपये ठेकेदारांना जादा दिले आहेत.

पाहा व्हिडिओ : 10 वर्षांच्या आदिश्रीने बनवलेल्या अ‍ॅपवर आता मिळणार सगळ्या झाडांची माहिती

 

Back to top button