ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभर कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 24 तासांत जगभरात 24 लाखांपेक्षाही अधिक नवे रुग्ण समोर आले. अशा स्थितीत कोरोनातून लवकर रिकव्हर होण्यासाठी तसेच भविष्यातील 'लाँग कोव्हिड'च्या धोक्याला कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी या पाच टिप्स दिलेल्या आहेत… (Corona Treatment)
शरीराला हायड्रेट ठेवा ः कोरोनातून लवकर बरे व्हायचे असेल तर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाचे वैज्ञानिक रॉबर्ट बूय यांनी म्हटले आहे की, हायड्रेट राहिल्याने शरीराला कोरोनातून रिकव्हर होण्यास मदत मिळते. यामुळे शरीराच्या विविध क्रिया चांगल्या प्रकारे होतात.
कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्यासाठी चांगली विश्रांती, आराम गरजेचा आहे. कोरोनानंतरही डॉक्टर शरीराला अधिक विश्रांती देण्याचा सल्ला देतात. या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या टीपकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात 'लाँग कोव्हिड'ची समस्या निर्माण होऊ शकते.
पोषक आहार ः आजारावेळी शरीरातील अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे अधिकाधिक पोषक आहार घेणे गरजेचे आहे. तळलेले, मसालेदार जेवण किंवा जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, मद्यपान, धूम—पान आदींपासून दूरच राहावे.
नियमित व्यायाम ः शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोज हलकाफुलका व्यायाम करणे गरजेचे आहे. अनुलोम-विलोम, कपालभाती यांसारख्या यौगिक क्रिया श्वासोच्छ्वासाच्या यंत्रणेला लाभदायक ठरतात. जर आपल्याला भरपूर व्यायाम करण्याची सवय असली तरी रिकव्हरीनंतर साध्या व्यायामानेच सुरुवात करावी.
मानसिक आरोग्य ः कोरोना महामारीमुळे केवळ शरीराचेच नव्हे तर मानसिक आरोग्याचेही नुकसान होत आहे. केवळ शरीरच कमजोर होत नाही, तर माणूस मनानेही खचतो. चिंता आणि तणाव आपल्या समस्येत भर टाकू शकतात. त्यामुळे मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष द्यावे.
काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे, धैर्याने संकटाला तोंड देणे, सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. विविध छंद जोपासण्यापासून ते ध्यानधारणेपर्यंतचे अनेक उपाय यासाठी उपयुक्त ठरतात.
हे ही वाचा :