

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेला अखेर अधिकृत प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात एमपीएड आणि एमएड अभ्यासक्रमांसाठी सीईटी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. या दोन अभ्यासक्रमांच्या नोंदणीपासूनच 2026 मधील सीईटी प्रवेश प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे.
एमपीएड आणि एमएड पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस 5 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या दोन अभ्यासक्रमांच्या नोंदणीपासूनच 2026 मधील सीईटी प्रक्रियेचा अधिकृत प्रारंभ झाला आहे. नोंदणीची अंतिम मुदत 20 जानेवारी 2026 असून, एमपीएड व एमएड सीईटी परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. यंदा परीक्षा 24 आणि 25 मार्च रोजी होणार आहे. यासंदर्भातील नोंदणी आणि अधिकृत माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील वर्षी या दोन प्रवेश परीक्षांसाठी एकूण 6 हजार 193 उमेदवारांनी नोंदणी केली होती.
विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध होणे व पडताळणी सुलभ व्हावी, यासाठी यंदापासून सीईटी प्रवेश नोंदणीसाठी ‘अपार आयडी’ अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी बंधनकारक असेल. नोंदणीदरम्यान उमेदवारांनी संबंधित आयडीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्याप अपार आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तो डिजिलॉकरद्वारे तयार करावा, असे कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तपशीलवार वेळापत्रक व परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले आहे.