

Raj Thackeray Wedding Card: राज ठाकरे हे नाव राजकारणात नेहमीच चर्चेत असतं, पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणालाच जास्त माहिती नाही. व्यासपीठावर आक्रमक भाषण करणारे राज ठाकरे स्वतःच्या आयुष्याबद्दल मात्र फारसं कधी उघडपणे बोलत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एखादी गोष्ट समोर आली की त्याची चर्चा होते.
सध्या असंच काहीसं घडत आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा एक जुना फोटो आणि त्यासोबत साधी पण भावनिक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्वागत समारंभः सायंकाळी ६ ते ९.
॥ श्री एकवीरा प्रसन्न ॥
जय महाराष्ट्र,
आमचा टिनू हा हा म्हणत स्वरराज झाला नि राजा म्हणून लग्नाला उभा राहिला नेपथ्यकार मोहन वाघ नि सौ पद्मश्री वाघ यांची सुकन्या चि. शर्मिला हिने राजाला जिंकलं आणि ते लग्नाला तयार झाले. आता लग्नाचे लाडू खायलाच हवेत पण त्याला मुहूर्तही हवा, म्हणून आपण सर्वांनी मंगळवार, दि. ११ डिसेंबर ९० रोजी वनिता समाज, शिवाजी मार्क, दादर, मुंबई येथे येऊन या दोघांनाही मनापासून आशीर्वाद द्यावेत हीच आमची इच्छा. मात्र अहेर आणि पुष्पगुच्छही आणू नयेत.
आमले नम्र,
बाळ केशव ठाकरे
सौ. मीना बाळ ठाकरे
श्रीकान्त केशव ठाकरे
सौ. मधुवंती श्रीकान्त ठाकरे
या लग्नपत्रिकेत कुठलाही औपचारिक थाट नाही. शब्दांमध्ये आपुलकी वाटते. “आमचा टिनू हा हा म्हणता स्वरराज झाला नि राजा म्हणून लग्नाला उभा राहिला…” अशी सुरुवात करणारी ही पत्रिका वाचताना आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं.
या पत्रिकेत एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे नात्यांमधला साधेपणा. लग्नाला यायचं, आशीर्वाद द्यायचे, पण अहेर किंवा पुष्पगुच्छ नकोत. आजच्या दिखाऊ काळात ही गोष्ट लोकांना अधिक भावतेय.
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची लव्ह स्टोरीही तितकीच युनिक आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्या ओळखीचा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, “मी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होते.
एका रविवारी मित्रमैत्रिणींना भेटायला गेले होते. त्याच वेळी राज त्याच्या मित्रांसोबत तिथेच होता.”
या भेटीत शिरीष पारकर याने ओळख करून दिली. तेव्हापासून गप्पा सुरू झाल्या. फोनवर बोलणं वाढलं. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता.
या आठवणी सांगताना शर्मिला ठाकरे थोड्या हसत म्हणतात, “तोच माझ्या मागे होता. तो काहीही म्हणो, पण सुरुवात त्यानेच केली होती.” राज ठाकरे मात्र या विषयावर नेहमीप्रमाणे फारसं बोलले नाहीत.
दोघांचं लग्न कमी वयात झालं, असं शर्मिला ठाकरे सांगतात. पण या नात्याला घरातून विरोध नव्हता. यामागचं कारण म्हणजे दोन्ही कुटुंबांमधील जुनी ओळख. बाळासाहेब ठाकरे आणि शर्मिलांचे वडील मोहन वाघ हे चांगले मित्र होते. ही मैत्री इतकी घट्ट होती की बाळासाहेब अमेरिकेला गेले असताना त्यांनी मोहन वाघांसाठी खास हॅजलब्लेड कॅमेरा आणला होता.
राज ठाकरे सांगतात, “बाळासाहेब आणि तिचे वडील एकमेकांना ओळखत होते. पण हिची आणि माझी ओळख आधी नव्हती.” तर शर्मिला ठाकरे एक गंमत सांगतात “राजची बहीण माझी मैत्रीण होती, पण तिला भाऊ आहे, हेच मला माहीत नव्हतं.”