

पुणे : पुणेकरांच्या संवेदनशील मनाला थेट स्पर्श करणारे, शब्दांविना संवाद साधणारे आणि क्षणभर थांबून विचार करायला लावणारे असे विलक्षण छायाचित्र प्रदर्शन सध्या फर्ग्युसन महाविद्यालयात भरले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक युवराज मलिक यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
वृत्तपत्रातील अनुभवी छायाचित्रकारांनी टिपलेली ही छायाचित्रे केवळ दृश्य न राहता जिवंत अनुभव बनतात. पुणे शहरातील सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी, धार्मिक श्रद्धा, शैक्षणिक प्रवाह आणि पर्यावरणाविषयीची काळजी — अशा विविध अंगांनी पुण्याचे अंतरंग उलगडणारे हे फोटो आहेत. प्रत्येक छायाचित्र स्वतंत्रपणे एक कथा सांगते, ती कथा जी अनेकदा पुणेकरांच्या मनात असते; पण शब्दांत मांडली जात नाही.
इथे केवळ कॅमेऱ्याचा कौशल्यपूर्ण वापर दिसत नाही, तर समाजाचे भान, माणसांशी असलेली नाळ आणि काळाची नोंदही ठळकपणे जाणवते. म्हणूनच हे प्रदर्शन पाहताना आपण केवळ फोटो पाहत नाही, तर पुणे शहराला नव्याने “वाचत” जातो.
हे छायाचित्र प्रदर्शन २१ डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात खुले आहे. पुण्याच्या आत्म्याशी संवाद साधण्याची, शहराकडे नव्या नजरेने पाहण्याची ही दुर्मिळ संधी असून जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोमवारी १५ डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, प्रकाशक आणि वाचकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे लिखित गिनीजगाथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या १२ गिनीज विश्वविक्रमांचा प्रवास आहे. महोत्सवाच्या माध्यमातून मागील २ वर्षांत ९ पेक्षा जास्त गिनीज विश्वविक्रम साकारण्यात आले आहेत.
रविवारी सायंकाळी प्रसिद्ध फ्युजन रॉक बँड थायक्कुडम ब्रिज यांच्या सादरीकरणाने महोत्सवात अविस्मरणीय रंगत आणत, पुस्तक महोत्सवात आलेल्या पुणेकरांना बँडच्या तालावर थिरकायला लावले. रविवारी थायक्कुडम ब्रिज या बँडचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला तरुणाईसह विविध वयोगटांतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कर्नाटक, लोकसंगीत, कर्नाटिक, सूफी, रॉक आणि पाश्चात्त्य संगीत यांचा अनोखा संगम साधणाऱ्या थायक्कुडम ब्रिजच्या सादरीकरणाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. लोकप्रिय गाणी, प्रभावी व्होकल्स, वाद्यवृंदाचा दमदार ठेका आणि प्रकाशयोजनांचा सुरेख मेळ यामुळे संपूर्ण परिसर संगीतमय झाला. काही गाण्यांवर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि ताल धरत कलाकारांना दाद दिली, तर अनेकांनी मोबाईलमध्ये तो क्षण कैद करत कार्यक्रमाचा आनंद घेतला.