

ठाणेः मनसे अध्यक्ष राज ठाकरे ११ डिसेंबर रोजी ठाणे कोर्टात एका गुन्ह्यातील सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार आहेत. ठाण्याच्या गडकरी नाट्यगृहाच्या समोरील रोडवर १२ एप्रिल २०२२ मध्ये मनसेची उत्तर सभा झाली होती.
या उत्तर सभेमध्ये स्वागत करताना शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी राज ठाकरे यांना तलवार भेट दिली होती. खुलेआमपणे व्यासपीठावर तलवार दिली म्हणून रवींद्र मोरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह राज ठाकरे यांच्यावरही नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आर्म ऍक्ट नुसार दाखल झाला होता.
या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी ठाकरे यांच्यासह चौघांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोप पत्रानुसार सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर राहणार असून पोलिस आणि न्यायालयीन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.