

Tirumala Silk Dupatta Scam Polyester Fraud TTD: तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. दक्षता अधिकाऱ्यांनी 2015 ते 2025 या दहा वर्षाच्या कालावधीत रेशमी उपरण्यांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे शोधून काढले आहे.
भेसळयुक्त लाडू वाद आणि परकापणी प्रकरणानंतर, आता अधिकाऱ्यांनी 100 टक्के पॉलिस्टर-सिल्क मिश्रणाचे बिल दाखवून प्रत्यक्षात बनावट रेशमी उपरणी पुरवण्यात आल्याचे शोधून काढले आहे. या घोटाळ्यामुळे 54 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका कंत्राटदाराने सुमारे 15,000 उपरणी प्रति नग 1,389 रुपये दराने पुरवली आणि ती रेशमाची असल्याचा दावा केला.
मात्र, केंद्रीय रेशीम मंडळासह दोन प्रयोगशाळांमध्ये पाठवलेले नमुने तपासले असता, ही उपरणी रेशमाची नसून पॉलिस्टरची असल्याचे सिद्ध झाले. पट्ट वस्त्रालू (रेशमी उपरणी) घोटाळ्यावर प्रतिक्रिया देताना टीटीडीचे अध्यक्ष बी. आर. नायडू म्हणाले, 'खरेदी विभागात काही अनियमितता झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याची दखल घेत आम्ही हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवले आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) रंगनायकुला मंडपममध्ये वेदासिरवचनमच्या वेळी देणगीदार आणि व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या भक्तांना रेशमी उपरणे भेट देते. हजारो भाविक दर्शन घेत असल्याने, ट्रस्ट दरवर्षी अनेक कोटी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात उपरणे खरेदी करते. त्यासाठी TTD कडून विशेष टेंडर जारी केले जाते.
टीटीडीचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने हे संपूर्ण प्रकरण आंध्र प्रदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे सोपवले आहे. उपरण्यांची तपासणी करण्यासाठी गोदाम आणि मंदिर परिसरातून नमुने घेण्यात आले. त्यानंतर बेंगळुरू आणि धर्मावरम येथील केंद्रीय रेशीम मंडळाच्या प्रयोगशाळेत चाचणी घेण्यात आली. दोन्ही तपास अहवालात सर्व उपरणे पॉलिस्टरचे असल्याचे स्पष्ट झाले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, उपरणे पुरवठादार VRS एक्सपोर्ट्सला अलीकडेच 15,000 उपरण्यांचे नवीन कंत्राट देण्यात आले. आता, तो करार देखील थांबवण्यात आला आहे. मंडळाने तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवला आहे आणि कथित फसवणुकीमागील लोकांची ओळख पटविण्यास सांगितले आहे.
मंदिराच्या नियमांनुसार, उपरणे पूर्णपणे शुद्ध रेशमापासून विणले पाहिजेत, ताना आणि विणकाम दोन्हीमध्ये 20/22 डेनियर धागा वापरला पाहिजे, ज्यामुळे त्याची जाडी किमान 31.5 डेनियर असावी.
प्रत्येक वस्तूवर एका बाजूला संस्कृतमध्ये "ओम नमो वेंकटेशय" आणि दुसऱ्या बाजूला तेलुगूमध्ये "ओम नमो वेंकटेशय" असे लिहिलेले असले पाहिजे, तसेच शंख, चक्र आणि नममची चिन्हे देखील कोरलेली असली पाहिजेत. उपरण्याचा आकार, वजन आणि बॉर्डर डिझाइनची माहिती दिली पाहिजे. तपासात असे दिसून आले की, कंपनीने स्वस्त पॉलिस्टर देऊन मंदिर ट्रस्टची फसवणूक केली आहे.
सप्टेंबर 2024 मध्ये पवित्र तिरुपती लाडू प्रसादाचा वाद उघडकीस आला होता, जेव्हा आंध्र प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंदिरात वाटल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये गायीच्या शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी किंवा भेसळयुक्त तूप असण्याची शक्यता असल्याचा आरोप केला होता.