Kashedi Ghat road
कशेडी घाटात रस्ता खचत चालला आहे.Pudhari News Network

सावधान! कशेडी घाटात रस्ता खचतोय, वाहतूक धोकादायक

साडेतीन फूट खोलवर खचणारा हा रस्ता बनलाय डेंजर झोन
धनराज गोपाळ

पोलादपूर : कशेडी घाटात भोगावच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता खचू लागला आहे. २५ जुलै २००५ पासून याच ठिकाणी रस्ता खचत असून यावर काममस्वरुपी उपाय करण्यास बांधकाम विभागाला आपयश आलेले आहे. ही जागा डेंजर झोन बनली असून वाहन चालकाची चूक झाल्यास वाहन थेट दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. गेल्या आठ दिवसापूर्वी हायड्रोजन गॅस वाहतूक करणारा ट्रक थेट दरीत कोसळून दुर्घटना झाल्याची ताजी घटना घडली असून महामार्ग प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी वाहन चालक आणि प्रवासी जनतेतून केली जात आहे.

Kashedi Ghat road
Heavy Rains : मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूरपासून ९ किलोमीटर अंतरावर दरवर्षी रस्ता खचत असतो. यंदाही रस्ता खचला आहे. रस्ता रत्नागिरीच्या दक्षिण बाजूने आणि मुंबईच्या उत्तर बाजूने दोन फूट खचला आहे. पावसाळ्यात येथे रस्ता खचण्याची प्रक्रिया सुरू होते आणि अंदाजे १०० मीटर अंतरात साडेतीन फूट खोलवर खचतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

या रस्त्याचे हे अवघड दुखणे २५ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर सुरू झाले आहे. यावर १९ वर्षांत बांधकाम विभागाला यावर अजूनही उपाययोजना करता आली नाही. २५ जुलै २००५ रोजी या ठिकाणी माथ्यापासून रस्त्यावर डोंगराचा भाग वेगळा होत मोठ्या आकाराचे दगड-धोंडे खाली घसरत आले होते. या महाकाय दरडीमुळे रस्त्यावरच २५ फुटापर्यंत डोंगर निर्माण झाला होता. जेसीबी, पोकलेन च्या साह्याने रात्रंदिवस काम केले तरीही दरड हटवायला १५ दिवस लागले होते. त्या दिवसांपासून या ठिकाणी दर पावसाळ्यात रस्ता खचत आहे. वेळोवेळी महामार्ग बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करण्यात येत असली तरी कायमस्वरुपी दुरुस्त होत नाही. या रस्त्यावरून ट्रेलर, टेम्पो, ट्रक अशा ४० टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या आहे माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे पावसाळ्यात येथील अंदाजे १०० मीटरचा रस्ता खड्ड्यांचा बनतो. आताही रस्त्यात खड्डे आहेत तसाच तो खचलादेखील आहे. त्यामुळे येथे अवजड वाहने एकतर बंद पडतात किवा मध्यभागात आल्यावर चढ चढताना मागे सरकून दरीत कोसळतात. या सर्वांमुळे हा धोकादायक स्पॉट बनला आहे.

Kashedi Ghat road
Raigad rains | महाडमध्ये मुसळधार कायम! किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

या जागेवर अपघात झाल्यास तळ कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. जंगलाचा भाग असल्याने आणि रात्रीची वेळ असेल तर वाहनचालक आणि प्रवशांच्या हालाला पारावार राहात नाही. तसेच आजबाजुच्या पळचिल, महालगुर, रावतळी, कशेडी, मनवेधार, खवटी, गवळीवाडी, जलाचीवाडी, किंजळा, घोगरा आडतामसडे, मोरेवाडी, ओंबळी, आडाचीवाडी, महालगुर, खडकवणे, गोलदरा, कामतवाडी, कातळी बंगला, या पंचक्रोशीतील गाव-वाडयातील जनतेसाठी हा मुख्य वाहतुकीचा मार्ग असून येथील वाहतूक बंद झाल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यातही विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. या विभागात जाणारे , येणारे शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी जनता आणि वाहन चालक यांचे हाल होताना दिसून येत आहे.

Kashedi Ghat road
रायगड : कशेडी घाटात नायट्रोजन गॅसची वाहतूक करणारा टँकर ७० फूट दरीत कोसळला

यातच आठ दिवसापूर्वी गॅस वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चा अपघात झाल्यानंतर कशेडी बोगदा मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. मात्र, आता वाहतूक जुन्या मार्गाने पुन्हा येथील वाहतूक सुरळीत सुरू झाली.तरीही धामणदेवी ते कशेडी बंगला पर्यंत घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्ता अपघात प्रवण क्षेत्र असा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणीमोठा अपघात होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकातून व्यक्त केली जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news