सरखेल कान्होजीराजे आंग्रे भारतीय नौदलाचे मानबिंदू : आदित्य हाडा

सरखेल कान्होजीराजे आंग्रे भारतीय नौदलाचे मानबिंदू : आदित्य हाडा
Published on
Updated on

अलिबाग: पुढारी वृत्तसेवा: मराठा आरमाराचे प्रमुख दर्यावर्दी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांना भारतीय नौदल आपला मानबिंदू मानते आणि त्यांच्या नीती धोरणांचे आधुनिक भारतीय नौदल आज देखील अनुकरण करते. भारतीय नौदल भविष्यात अलिबाग आणि परिसरातील अनेक लोकोपयोगी प्रकल्पात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवेल, असे प्रतिपादन भारतीय नौदलाच्या पश्चिमी क्षेत्र मुख्यालयाच्या आयएनएस-आंग्रे या नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा यांनी आज (सोमवार) येथे केले. जेएमएम कॉलेजच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या २९३ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित स्मृतिदिन सोहळ्यात आयएनएस-आंग्रे नौदल तळाचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर आदित्य हाडा यांनी येथील सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीवर भारतीय नौदलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. यावेळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.

आदित्य हाडा म्हणाले की, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी मराठा आरमार दूरदृष्टीने सुसज्ज केले. परकीय शत्रुकडे आधुनिक तंत्रज्ञान असतानाही सरखेल आंग्रे यांनी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून शत्रूला नामोहरम केले. त्यामुळे समुद्रावर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी आपली सत्ता गाजवली. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे कार्य, तत्कालीन परिस्थितीत मराठा नौदलाची आवश्यकता, आजच्या आधुनिक काळात कान्होजींच्या विचारांची प्रासंगिकता यावर कमोडोर हाडा यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. तसेच तरुणांना आधुनिक नौदलातील भविष्यकालीन संधी यावर देखील मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने अंमलात आणलेली अग्निपथ योजना भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय असून अग्निपथ योजनेअंतर्गंत तरुण-तरुणींना अग्निवीर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे, त्याचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आदित्य हाडा यांनी कान्होजी आंग्रे यांची युद्धनिती, युद्ध कौशल्य, दूरदृष्टी, सामाजिक दातृत्व या अनुषंगाने आढावा घेऊन भारतीय नौसेना ही कशाप्रकारे काम करते. याबाबतची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना दिली. इतिहास हा वाचून किंवा सोशल मीडियावर आपल्याला कळतो. मात्र प्रत्यक्षात ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यास खरा इतिहास आपल्याला थेट ज्ञात होत असतो, त्यातून स्फूर्ती प्राप्त होत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून नौसेनेत सामील होण्याचे आवाहन हाडा यांनी अखेरीस पुन्हा एकदा केले. जेएसएम कॉलेजमधील या कार्यक्रमप्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कस्बा या हेरिटेज मॅनेजमेंट कंपनीचे संचालक सचिन सावंत यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news