

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस असे नवे पर्व सुरु होत असून 15 सदस्य असलेल्या भाजपाला अध्यक्ष तर 16 सदस्य असलेल्या राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळाणार आहे. तर सर्वाधिक सदस्य निवडून आणणारी शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहे. मात्र भाजपाला अध्यक्षपद देण्यामागे रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याचे संकेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजापा प्रदेषाध्यक्षांच्या बैठकीत ठरला आहे. दरम्यान, रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करावी म्हणून शिवसेनेने प्रयत्न केले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला अखेर ठरला असून, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असे सूत्र ठरले असल्याची माहिती भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड.महेष मोहिते यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे. रायगड जिल्हा परिषदेत भाजपाला प्रथमच अध्यक्षपद मिळणार असल्याने भाजपामध्ये मोठे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्यांच वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवण्यात येणार हे देखील या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची निवडणूकपूर्व आघाडी होती. त्यावेळीच झालेल्या चर्चेनुसार उभयतांपैकी कोणाचेही कितीही सदस्य निवडून आले तर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाजपाचेच होतील असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेने दिला होता. तोच आता अंमलात येणार असल्याचे ॲड.मोहिते यांनी पूढे सांगीतले.
दरम्यान 12 मार्च रोजी भाजपा नेते महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, भाजापाचे आमदार प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, आ.रविंद्र पाटील,आ.ज्ञानेश्वर म्हात्रे, आ.निरंजन डावखरे आदी ज्येष्ठ नेते अलिबागमध्ये उपस्थित राहाणार असून अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडीनंतर येथील जेएसएम कॉलेज मैदानावर तीन वाजता जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे ॲड.मोहिते यांनी अखेरीस सांगीतले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी हर्षल पाटील, ॲड,प्रविण ठाकूर, चारुहास मगर, आशिष भट तर भाजपाचे ॲड.महेश मोहिते,
ॲड.आस्वाद पाटील ,ॲड.अंकित बंगेरा, सुनील दामले आदि पदाधिकारी येथील भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते. रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेना यांच्यात जिल्ह्यात तीव्र आणि विकोपाला गेलेला संघर्ष आहे. राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात मोठी रस्सीखेच सुरु आहे. पालकमंत्रीपदाच्या राजकीय वादाच्या निमित्ताने ,शिवसेना आमदार व मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिंदे शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा निर्णय झाला. तर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपाला आणि रायगडचे पालकंमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला असा निर्णय होण्याची शक्यता राष्ट्रवादी आणि भाजपा या उभय पक्षांमध्ये चर्चेत आहे.
रायगड जि.प.च्या 59 जागांपैकी पक्षीय बलाबलानुसार भाजापाचे 15 ,राष्ट्रवादी काँग्रेसचे 16 , शिंदे शिवसेनेचे 21 ,ठाकरे शिवसेना 05 तर काँग्रेसचे 02 सदस्य आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीककरीता आवश्यक 31 ही मॅजीक फिगर आम्ही निश्चितपणे गाठत असल्याने भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत कोणतीही अडणच नसल्याचे ॲड.मोहिते यांनी स्पष्ट केले