

मुंबई : कॉपी, तोतयागिरी, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर, एआय व डीजीटल साधनांच्या मदतीने होणारी फसवणूक, प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणे तसेच अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली परीक्षा देणे असे कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास आता थेट परीक्षेला बंदी आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्यातील सीईटी प्रवेश परीक्षांमध्ये वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदा कडक आणि व्यापक नियमावली लागू केली आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर दिली आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी याबरोबरच विधी, बीएड, हॉटेल मॅनेजमेंन्ट, आर्कीटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. तब्बल 17 अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटींपैकी 15 परीक्षा या संगणकाधारित पद्धतीने राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उमेदवार, परीक्षा कर्मचारी किंवा संस्थांकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार, अनुचित मार्गांचा वापर अथवा गैरवर्तन झाल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यासाठी नव्याने सुधारित नियमावली लागू करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कुठलेही गैरप्रकार घडू नये म्हणून विद्यार्थ्यांबरोबरच परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत तब्बल 12 लाख 92 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांना दोन संधी देण्याच्या निर्णयामुळे एकूण 17 लाख 39 हजार विद्यार्थी सीईटी परीक्षा देणार असल्याची माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या या नियमावलीत एकूण 13 प्रकारचे गैरप्रकार आणि गैरवर्तन स्पष्ट करण्यात आले असून त्यानुसार उमेदवारांवर परीक्षा बंदी, दंड तसेच कायदेशीर कारवाई करण्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.
परीक्षेदरम्यान स्मार्टफोन, मोबाईल फोन, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर (प्रतिबंधित ठिकाणी), ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन किंवा तत्सम गॅझेट्स बाळगणे किंवा वापरणे पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय एआय टूल्स, लपलेले कॅमेरे, स्क्रीन मिररिंग, रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअर किंवा कोणत्याही डिजिटल साधनांचा वापर करून प्रश्न किंवा उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारी तात्काळ रद्द केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये आयटी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.
परीक्षेदरम्यान उमेदवारांनी बोलणे, संकेत देणे, हावभावांची देवाणघेवाण करणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित उमेदवाराची त्या सीईटीची उमेदवारी रद्द केली जाईल. नोट्स, पुस्तके, सूत्रपत्रे किंवा कोणतेही लिखित साहित्य आढळल्यास शैक्षणिक वर्षातील सीईटी किंवा इतर कोणत्याही सीईटीसाठीची उमेदवारी रद्द केली जाईल.
परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही निरीक्षण, बायोमेट्रिक पडताळणी आणि कडक देखरेख अनिवार्य करण्यात आली आहे. एखाद्या परीक्षा केंद्राकडून निष्काळजीपणा, गैरवर्तन किंवा गैरकृत्यात सहभाग आढळल्यास सीईटी कक्ष त्या केंद्राची मान्यता तात्पुरती किंवा कायमची रद्द करण्यात येणार आहे.