

अलिबाग : गावातील तंटे गावातच मिटावे, यातून गावात शांतता निर्माण व्हावी यासाठी 15 ऑगस्ट 2007 पासून गावागावात महात्मा गांधी तंटामुक्त स्थापन झाल्या. रायगड जिल्ह्यात सुरुवातीच्या कालावधीत या अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु त्यानंतर राजकीय लोकांचे हस्तक्षेपामुळे तंटामुक्त समित्यांचा कारभार संशयास्पद होऊ लागला. त्यात शासकीय अनुदान बंद झाल्याने समित्या वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या एकाही तंटामुक्त गाव समितीचा कारभार रायगड जिल्ह्यात सुरू नाही.
यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले आहेत. कोणत्याही क्षुल्लक कारणाने पोलीस ठाण्यापर्यंत धाव घेतली जात असल्याने पोलिसांच्याही कामावर ताण पडु लागला आहे.
रायगड जिल्ह्यात 2016 पासून या समित्यांचा कारभार टप्प्याटप्प्याने कमी होत गेला. सध्या एकाही तंटामुक्त समितीला शासकीय अनुदान दिला जात नसल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाच्या माध्यमातून गावागावांमध्ये नेमलेल्या तंटामुक्त समित्या पूर्वी जोमाने काम करीत होत्या. अलीकडे गावातील तंट्यांकडे या समित्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. गावागावातील तंटामुक्त समितीचे अस्तित्वच गायब झाले आहे. पोलिस ठाण्यात सतत गावातील किरकोळ वादाच्या तक्रारी येत असल्याने तंटामुक्ती समिती केवळ कागदावरच उरली आहे. शेताच्या हद्दीवरून, सांडपाण्यावरून, घराच्या बांधकामावरून ग्रामपंचायत, सेवासंस्था, जमिनीच्या खरेदी-विक्रीतून नेहमीच वाद होत आहेत. होणारे वाद तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य सामोपचाराने गावातल्या गावातच मिटवत होते. निधी नसल्यामुळे समितीतील अध्यक्ष व सदस्यांनी आता याकडे दुर्लक्ष केले आहे.
गावातील किरकोळ वाद-तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. यामुळे गावागावांतील तंटे कमी झाले होते. गावात नेमलेल्या समित्याही जोमाने काम करीत होत्या. भावकीत उद्भवणारे तंटे सोडविण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यावर भर दिला जात होता. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्या अगोदरच मिटत होते.
गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी ग्रामपातळीवर तंटामुक्त समित्या स्थापन करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहिमेला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला होता.
गावातील किरकोळ वाद-तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. भावकीत उद्भवणारे तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्ती समितीचे काम चांगले होते. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्याअगोदरच मिटले जायचे. त्यातून गावपातळीवर एकोपा निर्माण होत होता. त्यामुळे मरगळ आलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान पुन्हा जोमाने राबवण्याची गरज आहे.
संदेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते
सध्या मात्र या अभियानाकडे शासनाने पाठ फिरविल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत दरवर्षी निवडल्या जाणाऱ्या समित्या केवळ नावालाच उरल्या असून, सरकारी अनास्थेमुळे समित्यांचे अस्तित्व शिल्लक राहिले नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील नागरिक केवळ तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यात जोर दिला जात आहे.