

पनवेल : पनवेल-पळस्पे गावात सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रा.पं. पळस्पेने रायगड जिल्हा अध्यक्ष शेतकरी सभेचे अनिल दंडेकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
पळस्पे हद्दीतून वाहणाऱ्या नदीपात्रात काही हॉटेल्स व निवासी संकुलांचे सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होऊन बंधाऱ्यांमध्ये साचत आहे. या दूषित पाण्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या बोअरवेल्सवर तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होत असून अनेक ठिकाणी पाणी पूर्णतः खराब झाले आहे.
या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नदीपात्रात योग्य तांत्रिक पद्धतीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रा.पं.ने नमूद केले आहे.
दरम्यान, ग्रा.पं.मार्फत संबंधित विभागांना याबाबत तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून देण्याची प्रक्रिया सुरू असून सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. गावालगत सुरू असलेल्या अवैध बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचे नाले बंद झाल्याने पावसाळ्यात घरांमध्ये व शाळांमध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
या सर्व बाबींची तातडीने दखल न घेतल्यास ग्रा.पं. पळस्पे व ग्रामस्थांच्या वतीने जलसमाधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.