

पनवेल : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. एकाच दिवशी तळोजा आणि खारघर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत परदेशी नागरिकांची माहिती लपविल्याप्रकरणी घर मालकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. परदेशी नागरिक कायदा 1946 मधील कलम 14 (क) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर 10 मधील पार्वती हाइट्स या इमारतीत कारवाई करण्यात आली.
इमारतीतील घर क्रमांक 501 मध्ये 35 आणि 42 वर्षांचे दोन परदेशी नागरिक वास्तव्यास होते. या नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवताना घरमालकाने केंद्र सरकारच्या परदेशी नागरिकांसाठी असलेल्या संकेतस्थळावर सी-फॉर्मद्वारे नोंदणी न केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे बेकायदा आश्रय देण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कारवाई करण्यात आली.
सेक्टर 35 एफ मधील ड्रीम सफायर या इमारतीतील दोन सदनिका परदेशी नागरिकांना भाड्याने देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार केलेल्या चौकशीअंती या सदनिकांमध्ये चार परदेशी नागरिक राहात असल्याचे समोर आले. येथेही घर मालकाने संबंधित नागरिकांबाबत कोणतीही माहिती पोलिसांना किंवा अधिकृत यंत्रणांना दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईमुळे बेकायदा वास्तव्य करणारे परदेशी नागरिक तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या तपासण्या अधिक तीव्र केल्या आहेत. त्या अंतर्गत कारवाई केली जात आहे.