

पनवेल ः विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला. मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाली होती. त्यानंतर गुरुवारी 71 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज (शुक्रवारी) जाहीर झाला.
यामध्ये 53 जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण 59 जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर सरस ठरले आहेत. त्या सोबत महाविकास आघाडी मधील शेतकरी कामगार पक्षाने केवल 9 जागा जिंकत आपले अस्तिव टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्या सोबत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारत 4 जागा जिंकल्या तर उबाठाने या निवडणुकीत खाते खोलत 5 जागा जिंकल्या आहेत. तसेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजीत दादा गटाला दोन दोन जागा मिळवण्यात यश आले आहे.
भाजपने ही निवडणूक पनवेल महानगरपालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली भाजप महायुतीने नियोजनबद्ध व संघटित प्रचार केला. विकासकेंद्रित धोरण, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला.
पनवेलकर सुज्ञ मतदारांनी महायुतीवर दाखवलेला प्रचंड विश्वास तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी घेतलेली अथक मेहनत हे या यशामागील प्रमुख कारण ठरले आहे. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा आणि पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात महायुती यशस्वी ठरली. सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
विजयानंतर संपूर्ण पनवेल शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. “भाजप महायुतीचा विजय असो”,“लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विजय असो”,“एकच वादा प्रशांत दादा”,“आमदार महेश बालदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा जयजयकाराच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.या विजयामुळे पनवेल शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांच्या समस्या सोडवणे, मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि पनवेलला आदर्श शहर बनवण्यासाठी भाजप महायुती कटिबद्ध असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.
यंदाचा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे दोन गट झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार मशाल चिन्ह घेऊन यंदा निवडणूक रिंगणात उतरले होते त्यापैकी पाच उभाटाच्या उमेदवारांना विजय मिळवता आला आहे तर अन्य सहा ते सात उमेदवारांना निसारटा पराभव पत्करावा लागला आहे मशाल चिन्ह घेऊन राजे झालेल्या प्रत्येक उमेदवारांनी जवळपास तीन हजार मतदान मिळवत भाजप उमेदवाराला चांगला घाम फोडला होता. प्रभाग 11 मधील समाधान काशीद यांनी 5 हजार 466 मत मिळवून भाजप उमेदवाराला धक्का दिला होता, मात्र भाजप उमेदवाराला 1 हजार 422 मते जास्त मिळाल्याने उमेदवार जिंकला
शेकाप महाविकास आघाडीने प्रचारात फक्त टीका आणि फेक नेरेटिव्ह पसरवले होते. तर भाजप महायुती केलेल्या कामाचा आढावा मांडून लोकांपुढे जात होते. त्यामुळे यावेळीही सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला नाही आणि त्याचा परिपाक म्हणून भाजप महायुतीने मोठा विजय मिळवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासनाची मजबूत पायाभरणी केली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संघटन बळकट करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळेच पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीला हा दणदणीत विजय मिळू शकला. हा विजय म्हणजे विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर पनवेलकरांनी दिलेली ठाम शिक्कामोर्तब आहे. नागरिकांना अपेक्षित विकास करण्याचा आम्ही संकल्प कायम केला आहे, त्यामुळे यापुढे विकासाचा झंझावात कायम ठेऊ.
आमदार प्रशांत ठाकूर