Panvel Municipal Election Result: पनवेल महापालिका निवडणूक : नात्यांची लढाई, मेव्हण्याने दाजींवर मिळवला विजय
विक्रम बाबर
पनवेल: राजकारणात नाती, गोतावळे आणि माया बाजूला पडतात, हे पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिका निवडणुकीत स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक १४ मध्ये सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याला स्वतःच्या मेव्हण्यानेच पराभूत केल्याची अनोखी आणि चर्चेत राहिलेली लढत अखेर निकालात निघाली. या नात्यांतील राजकीय संघर्षात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लतिफ शेख यांनी भाजपचे उमेदवार तथा त्यांचे दाजी इकबाल काझी यांचा पराभव करत विजय मिळवला.
प्रभाग १४ मधील ही लढत केवळ दोन राजकीय पक्षांमधील नव्हती, तर ती दोन नात्यांमधील होती. एकीकडे बहिणीचे पती इकबाल काझी, तर दुसरीकडे त्यांचे सख्खे मेव्हणे लतिफ शेख. निवडणुकीपूर्वीपासूनच ही लढत पनवेलकरांच्या चर्चेचा विषय ठरली होती. प्रचाराच्या मैदानात दोघेही एकमेकांसमोर ठामपणे उभे ठाकले होते. नातेसंबंधांची माया बाजूला ठेवून, विकास, नेतृत्व आणि विश्वास या मुद्द्यांवर ही लढत रंगली.
विशेष म्हणजे, पनवेल महानगरपालिकेच्या एकूण २४५ उमेदवारांमध्ये लतिफ शेख आणि इकबाल काझी हे दोघेही ‘कोट्याधीश उमेदवार’ म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे ही निवडणूक केवळ भावनिकच नव्हे, तर आर्थिक आणि राजकीय ताकदीचीही कसोटी ठरली.
मतमोजणीअंती लतिफ शेख यांनी ८ हजार ९३९ मते मिळवत आघाडी घेतली, तर इकबाल काझी यांना ७ हजार ६८० मतांवर समाधान मानावे लागले. सुमारे १ हजार २५४ मतांच्या फरकाने लतिफ शेख यांनी दाजींवर विजय मिळवला. निकाल जाहीर होताच प्रभागात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे पराभवाची सलही दिसून आली.
या लढतीने एक गोष्ट अधोरेखित केली—राजकारणात नाती महत्त्वाची असली तरी मतदारांचा कौल अधिक महत्त्वाचा असतो. नात्यातील माया मनात असली, तरी निवडणुकीच्या रणांगणात विचार, काम आणि विश्वास यालाच मतदारांनी प्राधान्य दिले. अखेर, प्रभाग १४ मधील ही नात्यांची लढाई मेव्हण्याच्या विजयाने इतिहासात नोंदली गेली.

