

मुरुड जंजिरा : परीक्षांचा हंगाम लवकरच संपणार आहे. परीक्षांनतर रायगड जिल्ह्यात पुन्हा मोठा पर्यटन हंगाम सुरू होणार आहे. मुरुडला उन्हाळी सुट्टीसाठी पर्यटकांनी आधीच हॉटेल बुकिंग सुरू केली आहे.
राज्यभरातील पर्यटकांकडून गेल्या काही वर्षात विशेष पसंती दिली जात आहे. यावर्षी एप्रिलच्या 15 तारखेपासून पर्यटक मुरुडकडे मोठ्या संख्येनी वळणार असल्याचे सांगितले जाते. कारण मुरुडच्या परिसरात वाढत्या सुखसोयी, पर्यटकांना किनाऱ्यावर बोटिंग, समुद्रातील जलदुर्गावर जाण्यासाठी बोटींची सुविधा, किनाऱ्यावरील बागांचे सुशोभीकरण, समुद्रकिनारी सुसज्ज पार्कींगमुळे पर्यटकांना निर्धस्तपणे गाडी किनाऱ्यावर लावून समुद्रात पोहण्यासाठी जात येते.
मुंबई, पुणे, नाशिक येथील पर्यटक मोठ्या संख्येने मुरुडला येतात. मुरुडला शनिवार-रविवार आणि जोडून सुट्ट्यांच्या काळात तर गर्दीचे विक्रम नोंदविले जातात. याचा परिणाम म्हणून वाहतुकीची कोंडी, टोल नाक्यावरील गर्दी, पार्किंगच्या वाहनांच्या रांगा, हुल्लडबाज पर्यटकांचा त्रास होत असतो. बेफिकीर पर्यटकांची कचराबाजी झाली तरी पालिका समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छ करत असते. किनाऱ्यावर कांदाभजी, भुट्टा, नॉनव्हेज, वडा-पाव खात खात भिजतानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळे हाउसफुल्ल होतात. मुरुड पालिका किनाऱ्यावरील स्टोल धारकांचा कचरा 2 वेळा उचलते त्यामुळे समुद्रकिनारा स्वच्छ राहतो व पर्यटक आनंदाने फिरू शकतात.
मुरुडला वॉटर पार्क सुरु झाल्याने पर्यटक मुरुडला हॉटेलात 2 दिवस राहण्यासाठी येतील. 1 दिवस वॉटर पार्कला तर 1 दिवस किल्ला व समुद्रात लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणार किनाऱ्यावरील हॉटेल मालकांना पार्कींचा प्रश्न होता तो आता संपला आहे. किनाऱ्यावर 200 गाड्या पार्कींग होणार आहेत.
यावर्षी उन्हाळी सुट्टीत मुरुड फुल्ल होणार असल्याचे दिसते. सध्या अलिबाग-मुरुड रस्त्याचे काम सुरु असल्याने पर्यटकांनी नागोठणे-रोहा- गारंबी मार्गे मुरुडला यावे अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच पर्यटन व्यावसायिकांचीही जय्यत तयारी करीत आहेत.
विशाल समुद्रकिनारा व नारळ पोफळीच्या बागांमुळे मुरुडचा किनारा पर्यटकांचा आवडता आहे. नजीक पद्मदुर्ग किल्ला आहे. येथील दत्तमंदिरावरून टिपलेले मनमोहक चित्र. (छायाचित्र- सुधीर नाझरे)