

नागोठणे, इंदापूर, गोरेगाव : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारकडून वारंवार आदेश देऊनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामे ठेकेदारांकडून वेळेत पूर्ण होत नसल्याने तब्बल 17 वर्षांनंतरही या महामार्गाची रडकथा संपलेली नाही. अनेक ठिकाणी काम सुरूच नसल्याने मे 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याची दिलेली मुदतही आता हुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ‘कामच सुरू नाही, मग रस्ता पूर्ण कसा होणार?’ असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते लोणेरे या सुमारे 51 किलोमीटरच्या टप्प्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नागोठणे, कोलाड, आंबेवाडी, इंदापूर-माणगाव बायपास आणि लोणेरे या भागांत अर्धवट उड्डाणपूल, रखडलेले बायपास, खड्डेमय सर्व्हिस रोड आणि धुळीचे साम्राज्य अशी अवस्था दिसून येत आहे. दैनिक ‘पुढारी’च्या ग्राउंड सर्व्हेमध्ये अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून काम बंद असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.
नागोठणे हद्दीत कामथ हॉटेल ते मीरानगर पेट्रोल पंप तसेच रेल्वे स्थानकासमोरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पर्यायी मार्ग अरुंद आणि खड्डेमय असल्याने येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पुलाखालून रस्ता असल्याने दोन्ही बाजूची वाहने नीट दिसत नाहीत. तसेच सूचना फलक नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सरकारी दवाखान्यासमोरील बसथांब्यामुळे वळणावरून येणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताची शक्यता कायम आहे. दुचाकीस्वारांचे अपघातही येथे घडले आहेत.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोलाड व आंबेवाडी येथील अनेक दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र 17 वर्षांनंतरही येथे उड्डाणपूल, गटारे आणि बायपासचे काम अपूर्णच आहे. सणासुदीच्या काळात तसेच शनिवार-रविवारी येथे तासन्तास वाहतूक कोंडी होत असते. दरम्यान, रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल केला जाणार नाही, असे आश्वासन मंत्री उदय सामंत व मंत्री आदिती तटकरे यांनी दिले होते. तरीही टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
इंदापूर बायपासचे काम होळीपासून पूर्णपणे बंद असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे क्रॉसिंग ब्रिज आणि नदीवरील पुलाचे कामही थांबले आहे. माणगाव येथील बायपासचे कामदेखील ठप्प असून रेल्वेवरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. जय भारत जिओ इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत हे काम सुरू आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. बायपास न झाल्याने इंदापूर आणि माणगाव शहरात सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
लोणेरे येथील उड्डाणपूल अलीकडेच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत खराब आहे. मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि रस्त्यावर साचलेली खडी यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जे. बी. सावंत व ना. म. जोशी शाळा-कॉलेज, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि स्थानिक नागरिकांना दररोज धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे. खड्डे बुजवण्याचे साधे कामही ठेकेदारांकडून केले जात नसल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी नेतेमंडळी वेळोवेळी पाहणी दौरे करत असले, तरी प्रत्यक्षात कामाला गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.