

खालापूर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या सुरुवातीच्या टप्प्यावर शुक्रवारी तीन ट्रकचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर जिथे मिसिंग लिंक रोड सुरू होतो, त्या ठिकाणी तीन ट्रक एकमेकांवर जोरात आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच आयआरबी डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, स्वामीनी ॲम्बुलन्स सेवा या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.
सदर घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतली असून, मंदावलेली वाहतूक आता पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.
दरम्यान, एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.