

नवी मुंबई: नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे याचा थेट परिणाम दरावरती झाला आहे. सध्या भाजीपाला 125 ते 150 रुपये किलोने विकला जात आहे.
कडक उन्हाळा असल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झालेला आहे. मार्केटमध्ये एरव्ही 700 ते 800 गाड्यांची होणारी भाजीपाला आवक आता थेट 500 गाड्यांवरती घसरली आहे. परिणामी घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात भाव भडकले असून प्रत्येक भाजी 150 ते 200 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचल्याने, सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसू लागला आहे.
मार्केटमध्ये भाजीपाला कमी प्रमाणात आल्यामुळे घाऊक दरामध्ये 40 ते 50 टक्के वाढ झाली आहे. जी भाजी आधी शंभराच्या आत होती, ती आता थेट 200 ते 250 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. बीन्स आणि वाटाणादेखील थेट 240 रुपयांवर गेले आहेत.
वाटाणा 160 ते 180 रुपये किलो, वांगी 120 ते 130 रुपये किलो, दोडका 120 ते 130 रुपये किलो, आणि शेवगा 150 रुपये किलो दराने विकला जात आहे.