

Maharashtra Mumbai-Goa Highway accidents updates
महाड : कोकणात जाणारा एकमेव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मागील नऊ महिन्यात इंदापूर ते कशेडी बोगदापर्यंत या पट्ट्यात वाहनांच्या झालेल्या अपघातात ३६ जण मृत्युमुखी पडले. महामार्गाचे चौपदरीकरण झाले तरी, अपघाताची मालिका मात्र चालूच असल्याचे चित्र या महामार्गावर पाहण्यास मिळत आहेत.
कोकणात जाणारा एकमेव मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग असून तब्बल १८ वर्षे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्यापही रखडलेले आहे. अध्यात्मिक या महामार्गाचे काम पूर्णत्वास होण्यास अजून दोन वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे दरवर्षी डिसेंबर अखेर हा महामार्ग पूर्ण होईल असे सांगत आहेत. दरम्यान या महामार्गावर कामांची स्थिती पाहता अजून दोन वर्षे तरी हा महामार्ग पूर्ण होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अशा प्रतिक्रिया कोकणातून मुंबई व मुंबईतून कोकणात दररोज एस टी महामंडळाच्या व खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इंदापूर ते कशेडी बोगदापर्यंतच्या ७०किलोमीटरच्या पट्ट्यात १ जानेवारी ते सप्टेंबर अखेर या ९ महिन्याच्या कालावधीत ६९ अपघात झाले. यामध्ये ३६ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ७९ प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले. २८ प्रवाशांना मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या तर ४२ प्रवासी किरकोळरित्या जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक रामचंद्र ढाकणे यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बोगद्यापर्यंतच्या ७० किलोमीटरच्या अंतरामध्ये वेगाने वाहने चालवणे, वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणे, वाहनाच्या आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन प्रवास करणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे, यासारख्या प्रकरणांमध्ये ६ हजार १५४ केसेस वाहन चालकांवर दाखल केल्या आहेत. यामध्ये ७४ लाख ९८ हजार ४५० रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी ५ लाख ५६ हजार ४५० रुपयांचा दंड जमा झाला तर ६९ हजार ४२० रुपये दंड वाहन चालकांकडून अद्याप जमा झालेला नाही; अशी माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.