

कुडाळ : गेले चार-पाच दिवस कोसळणार्या संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून महामार्गाची पुन्हा चाळण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात आली, तरी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोसळलेल्या मुसळधार पावसाने या डागडुजी कामाचा फोलपणा उघड केला आहे. पावसाने खड्ड्यांत भरलेली मलमपट्टी वाहून गेल्याने महामार्गाची अवस्था बिकट बनली आहे. हे खड्डे चुकवण्याची कसरत करत वाहनचालक, गणेशभक्त व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बाप्पांचे आगमन याच खड्डेमय रस्त्याने झाले असून विसर्जनालाही पुन्हा याच खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे.
पावसाळा सुरू होताच महामार्गासह शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची खड्डे पडून दुर्दशा झाली होती. या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालक व नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानंतर बांधकाम विभागांच्या यंत्रणा कामाला लागल्या. गणेशोत्सव पार्श्वभूमीवर भर पावसात महामार्गासह जिल्हा व ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे गणेशभक्त, नागरिकांना गणेशोत्सव कालावधीत तरी सुखकर प्रवास करता येईल, असे वाटत होते. मात्र श्री गणेश चतुर्थी आधी दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा सर्वत्र मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात खड्डे बुजविण्याची तकलादू मलमपट्टी वाहून गेली.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळहद्दीत पणदूर आणि वेताळबांबर्डे येथे खड्डे पडून महामार्गाची चाळण झाली आहे. या ठिकाणी वारंवार खड्डे पडतात, ते बुजविण्यातही येतात. मात्र केवळ 24 तासांतच खड्डे पुन्हा पूर्ववत होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदाराने या खड्ड्यांसमोर हात टेकल्याचे चित्र आहे. वाहनांच्या रहदारीमुळे खड्ड्यांची खोली आणि रूंदी वाढत असून, पावसाच्या पाण्याने डबकी तयार होत असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीधारकांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. सध्या गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. परिणामी, महामार्गावर वाहनांची संख्या कमालीची वाढली आहे. पणदूर आणि वेताळबांबर्डे येथे वाह9चालक, गणेशभक्तांना महामार्गावरून जीवघेणी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघातांची भीती व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांतून प्रवास करताना प्रशासन केवळ मलमपट्टी करून जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकते, अपघातात एखादा बळी जाण्याची वाट प्रशासन पाहतंय काय? अशा संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक, प्रवासी आणि नागरिकांमधून उमटत आहेत.