

कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पुई गावाच्या हद्दीत असणार्या महिसदरा नदीवरील पुलावर गेली 20 ते 25 दिवसांपासून पुलाच्या मधोमध मोठा जीवघेणा खड्डा पडला आहे. या महामार्गावर दिवसेंदिवस वाढत जाणार्या रहदारीचा विचार करता या खड्डयांमुळे या पुलावरून प्रवास करणार्या वाहचालकांसहित प्रवाश्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर हा खड्डा भरला जाईल काय? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील मुंबई-बाजूकडून कोलाड बाजूकडे जाणार्या महिसदरा नदीपुलावर गेली 20 ते 25 दिवसांपासून मोठा जीवाघेणा खड्डा पडला आहे. या खड्डयातून मार्ग काढतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दोन दिवसांपूर्वी एक स्कुटी चालक या खड्ड्यात पडून जखमी झाला आहे. सुदैवाने तो थोडक्यात बचावला. याकडे संबंधित बांधकाम विभाग यांच्याकडून हा खड्डा त्वरित भरला जावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम गेली 18 वर्षांपासून सुरु असून ते अर्धवट स्थितीत आहे. तसेच या महामार्गांवरील महिसदरा नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम चार ते पाच वर्षांपूर्वी केले आहे. या पुलाचा फक्त कोसळलेला भाग दुरुस्त केला असून पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे नवीन बांधण्यात येऊन जणू हा पुल नवीन बांधण्यात आला असल्याचे भासविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असंख्य औद्योगिक कारखाने, पर्यटन स्थळे, शाळा, कॉलेज असल्यामुळे या महामार्गांवर प्रचंड रहदारी वाढली असल्याचे दिसून येत आहे. या मार्गांवरून पादचारी नागरिक, सायकलस्वार, मोटार सायकल स्वार तसेच अवजड, वाहने मुंबई बाजुकडून गोवा बाजूकडे जात असतात.
मुंबई-गोवा हायवेवरील महिसदरा नदीच्या जीर्ण झालेल्या पुलाचे काम 50 वर्षांपूर्वी झाले होते त्यामुळे या पुलाच्या जागी नवीन पुलाचे बांधकाम केले पाहिजे होते. परंतु हे राहिले दूर! जो जुन्या पुलाचा भाग कोसळला होता. तो भाग दुरुस्ती करून पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे फक्त नवीन बांधण्यात आले. परंतु हा पुल किती दिवस तग धरील असे पुलावर पडलेल्या मोठया खड्ड्यामुळे दिसून येत आहे. या खड्डयांमुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण?
दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते, पुई