

अलिबाग : रखडलेले चौपदरीकरण..., धोकादायक वळणे..., ठिकठिकाणी पडलेले खड्डे..., महामार्गाच्या क्षमतेपेक्षा सुरू असलेली जास्त वाहतूक ..., भरधाव वाहने..., यामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर 32 अपघात प्रवण क्षेत्रं आढळून आली आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या विचारात घेतली असता, अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून येते.
या महामार्गावर मागील 14 वर्षात 5 हजार 58 अपघात झाले असून, त्यामध्ये 1 हजार 229 जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. महामार्गावरुन दररोज सुमारे 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टन एवढी वाहतुक होते. तसेच पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले आहे. तसेच इंदापूर पुढील दुसऱ्या टप्प्याच्या कामाचीही तीच गत आहे. महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच पर्यायी मार्ग, पुलांची कामे, संरक्षक फलकांचा अभाव या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. परिणामी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करतात. मुंबई गोवा महामार्गावर 32 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. यामध्ये खारपाडा पूल, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशी फाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळी खिंड, तळवली, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गोरेगाव बस स्थानकाच्या 500 मीटरमधील, लोणेरे बसस्थानकाच्या 200 मीटरमध्ये, टेमपाले ते लाखपाले ते पेहेल, गांधारपाले, वीर, वीर फाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले या ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे, त्या अगोदरच फलक लावून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले जाते. ठिकठिकाणी वाहतुकीचे दहा सुवर्ण नियम फलकाद्वारे लावून वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांना वाहन सुरक्षित चालविण्याचे संदेश दिले जात आहेत.