

रायगड : गेली 10 वर्षे अनुभवायला मिळत असलेला मत्स्य दुष्काळ लक्षात घेऊन यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने या अर्थसंकल्पात 1200 कोटींची भरीव तरतूद केली आहे. कोकणात मत्स्य व्यवसायात 15 लाखांपेक्षा जास्त मच्छीमार व्यावसायिक असून, मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देत हे उत्पादन वाढविण्यासाठी आता पावले उचलली जाणार आहेत.
विशेषतः मत्स्य व्यवसाय, रस्ते आणि काजू उत्पादकांसाठी सरकारने मोठी तिजोरी उघडली आहे. मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकासांतर्गत मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी दरवर्षी 1,240 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा फायदा कोकणातील 15 लाखांपेक्षा जास्त मच्छीमार व्यावसायिकांना होणार आहे.
केंद्रीय आणि राज्याच्या समन्वयाने किनारपट्टीच्या विकासासाठी आणि आधुनिक फिशिंग जेटींसाठी सुमारे 6,000 ते 10,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पायाभूत सुविधा आणि दळणवळण विकासांतर्गत मुंबई कोस्टल रोड (उत्तर) या प्रकल्पासाठी 4,700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ज्याचा थेट फायदा उत्तर कोकण आणि मुंबईला जोडणाऱ्या भागाला होईल. आज सादर झालेल्या 2026-27 च्या
राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यासह कोकणासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग कार्याचा गौरव म्हणून या ऐतिहासिक स्थळाच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी विशेष विकास आराखडा तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी भरभरुन देवून कोकणच्या विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी आभार व्यक्त करतो. या निर्णयामुळे राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. गेल्यावर्षी पर्यंत मत्स्य व्यवसाय खात्याचे बजेट 414 कोटीपर्यंत होते. आता हे बजेट 1200 कोटीपर्यंत या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.