

कुख्यात गँगस्टर इकबाल मिर्चीच्या
700 कोटींच्या संपत्तीवर येणार टाच
ईडीची जप्तीच्या कारवाईसाठी विशेष न्यायालयात धाव
मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार गँगस्टर इकबाल मिर्चीच्या 700 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच येण्याची चिन्हे आहेत. मिर्चीची मालमत्ता जप्त करण्यासाठी परवानगी मागत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वीही इकबाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केलेली आहे.
गुन्हेगारी कारवायांतील सहभागाबरोबरच फरार आर्थिक गुन्हेगार असलेल्या इकबाल मिर्ची आणि त्याच्या परिवाराच्या नामावर 700 कोटी रुपयांच्या 15 मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्या मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या संपत्तीमध्ये वरळी भागातील तीन मालमत्तांचा समावेश आहे. संबंधित मालमत्तांची किंमत 497 कोटी रुपयांच्या घरात आहे. तसेच दुबईतील हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट व इतर मालमत्तांचा समावेश आहे.
कुख्यात गुंड इकबाल मिर्चीचा लंडनमध्ये 2013 मध्ये मृत्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असलेला इकबाल मिर्ची याने देश-विदेशात अचल संपत्ती व व्यावसायिक मालमत्ता मिळवली होती. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी त्याने मालमत्ता खरेदी केली होती.
ईडीने यापूर्वी 798 करोड रुपये मूल्याच्या संपत्ती जप्त केल्या होत्या. त्यात मुंबईतील हॉटेल, सिनेमागृह तसेच पाचगणी येथील भूखंडाचा समावेश होता. तसेच मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मिर्चीची पत्नी आणि मुलांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले असून ते सध्या परदेशात आहेत.