

खाडीपट्टा (रायगड) : रघुनाथ भागवत
ऐन भात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने जोरदार बरसात केल्याने पिकाचे झालेले भरमसाठ नुकसान भरुन काढता काढता आता भात मळणीचे कामे सुरु आहेत, तर दुसरीकडे गेली आठ-दहा दिवस पडत असलेली हुडहुडी भरणारी थंडी यामुळे खरीप हंगामातील कडधान्यासह आंबा कलमांना पोषक वातावरण बनत चालले आहे, त्यामुळे भात पिकाच्या नुकसानीतून बाहेर निघता निघता दुबार पिक चांगले बहरेल अशी खुशी शेतकऱ्यांना वाटत आहे.
ऑक्टोबर महिन्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर परतीच्या पावसाने शेतकरी राजाचे मोठे नुकसान केले, ज्यामुळे भातशेतीचे पीक कापण्या योग्य तयार झालेले असताना हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला. यामधून सावरताना आता गेली आठ-दहा दिवस हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील आंबा झाडांना आणि कडधान्याच्या शेतीला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण सदर कडधान्यासह आंबा फळाला पोषक ठरणारे असल्याचे शेतकऱ्यांनी नमुद केले.
गतवर्षी आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते, अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची झोप उडवली. सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्यातच्या शेवटी मोहोर येण्यास सुरुवात होते, मात्र अवकाळी पावसाने फटका दिल्याने मोहोर आल्यानंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेल्या फवारणीसह आलेल्या मोहोरचे देखील नुकसान झाले होते. त्यानंतर देखील झाडांवर चांगले फळ लागल्यानंतर अवकाळीने फटका दिल्याने फळाना गळती लागून मोठे नुकसान झाले. सद्या आंबा फळासाठी चांगले वातावरण तयार असून थंडी आणि दव यामुळे नुकत्याच केलेल्या पहिल्या फवारणीचा फायदा मोहोर येण्यासाठी लाभदायक होईल अशी आशा आंबा बागायतदारांना वाटत आहे. कडधान्याच्या शेतीसाठी
देखील सद्याचे वातावरण पोषक असून असेच वातावरण राहिल्यास आंबा फळासह कडधान्याची शेती देखील चांगली बहरेल असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वातावरणाने अशीच साथ दिली, तर येत्या सात-आठ दिवसांमध्ये दुसऱ्या फवारणीला सुरुवात होईल.
हवेमध्ये गारवा
ऑक्टोबर महिन्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर परतीच्या पावसाने शेतकरी राजाचे मोठे नुकसान केले. ज्यामुळे भातशेतीचे पीक कापण्या योग्य तयार झालेले असताना हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत जमीनदोस्त झाला. यामधून सावताना आता सध्या गेली आठ-दहा दिवस हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून थंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील आंबा झाडांना आणि कडधान्याच्या शेतीला पोषक असे वातावरण तयार झाले आहे.