

रायगड : अलिबाग-पेण मार्गावरील अलिबाग ते गोंधळपाडा या एक किलोमीटरच्या मार्गावर सतत वाहतूककोंडी होत आहे. सध्या पर्यटकांची वाहने वाढल्याने आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे येथे सतत वाहतूककोंडी होत आहे. यात अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांनाही मोकळा रस्ता मिळत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांमधील रुग्णांना धोका वाढत आहे.
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत 'डायल १०८' ही रूग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल १० वर्ष पूर्ण केले आहे. या १० वर्षाच्या कालावधीत १०८ रूग्णवाहिकेची सेवा रूग्णांना जीवनदान देणारी ठरली आहे.
कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर १०८ रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 'एक-शून्य-आठ' हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी २०१४ मध्ये झाली. रूग्णवाहिकेत पल्स ऑक्समिीटर, मेडीकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे.
रायगड जिल्ह्यातील २ लाख ५५ रुग्णांना महाराष्ट्र अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेने आतापर्यंत वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. अपघातग्रस्त, आगीसारख्या घटनांमध्ये भाजलेले रुग्ण, हृदयरुग्ण, जखमी, विषबाधा झालेले, एखाद्या आपत्तीत झालेली इजा, गर्भवती महिला, आत्महत्येसारखा प्रयत्न करणा-या व्यक्ती अशा अनेकांना या सेवेचा उपयोग झाला आहे.
अलिबाग-पेण मार्गावरील अलिबाग ते गोंधळपाडा या एक किलोमीटरच्या मार्गावर सतत वाहतूककोंडी होत आहे. सध्या पर्यटकांची वाहने वाढल्याने आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे येथे सतत वाहतूककोंडी होत आहे. यात अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांनाही मोकळा रस्ता मिळत नाही. त्यामुळे रुग्णवाहिकांमधील रुग्णांना धोका वाढत आहे. मंगळवारी दुपारी पिंपळभाट येथे एक १०८ रुग्णवाहिका वाहतूककोंडीत अडकली होती. दरम्यान वाढत्या वाहतुकीने पोलीस यंत्रणाही दिवसभर भर उन्हात वाहतूक नियंत्रण करीत आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांकडून होणार घुसखोरी यामुळे मुख्य मार्गावर कोंडी होत आहे, याचा परिणाम स्थानिकांसह प्रवाशांवरही होत आहे. अपुरे पोलीस बळ, कामाचा ताण आणि वाढणारी वाहने यामुळे सारेच हैराण झाले आहेत.