

महाड: विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेरून काही आणले नाही, असे म्हणत शिवीगाळ करणे, तलाक देण्याची धमकी देणे, तसेच फिनेल व कफसिरप पाजल्याचा आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे. याशिवाय मोबाईलच्या चार्जरच्या वायरने मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा समीर तालिब (वय २०, गृहिणी) यांचे लग्न झाल्यानंतर १२ मे २०२४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत त्या म्हसळा तालुक्यांतील वरवटणे येथे सासरी राहत होत्या. त्यांचे पती समीर अब्दुल लतीफ तालिब हे परदेशात राहून दोन वर्षे घरी आले नसल्याचे, तसेच तलाक देण्याची धमकी देऊन मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सासरच्या अन्य मंडळींकडून माहेरून काही आणले नसल्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. फिनेल व कफ सिरप पाजून शारीरिक छळ केल्याचे, तसेच मोबाईलच्या चार्जरच्या वायरने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी व त्यांच्या मुलीला शिवीगाळ, मानसिक छळ केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी समीर अब्दुल लतीफ तालिब (वय ३०), रुक्साना अब्दुल लतीफ तालिब (वय ६१), वाशीत अब्दुल लतीफ तालिब (वय ३६), आमरीन वाशीत तालिब (वय ३२) आणि तहेरीन आतिब तालिब (वय ३२), सर्व रा. वरवटणे, ता. म्हसळा, जि. रायगड, यांच्याविरुद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.