

रायगड : दुरावलेल्या नात्यांमध्ये रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या लोकअदालतीने आशेचा किरण निर्माण केला असून, मागील एक वर्षात घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या 25 जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे.
एकमेकांवरील संशय, कुटुंबांतील वादविवाद, व्यसनाधीनता, पैशांची मागणी, पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, शारीरिक व मानसिक छळ यासह विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये कौटुंबिक कलह वाढताना दिसत आहे. अनेक प्रकरणे थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे. मात्र, अशा कोमेजलेल्या नात्यांमध्ये रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या लोकअदालतीने आशेचा किरण निर्माण केला असून,
मागील एक वर्षात घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या तब्बल 25 जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. मागील वर्षभरात झालेल्या चार लोकअदालतींमध्ये 3 हजार 102 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये लोकअदालतींमधून तुटणाऱ्या संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न केला.
घटस्फोटासाठी न्यायालयाची पायरी चढलेल्या पती-पत्नींची प्रकरणे तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवण्यात येतात. यामध्ये समुपदेशन, संवाद आणि समंजस मार्गदर्शनाच्या माध्यमातून 25 पती-पत्नींमधील दुरावा दूर करण्यात यश आले. यामुळे दोन्ही कुटुंबांचे भवितव्यही वाचले आहे.
22 मार्च 2025 रोजी चार, 10 मे 2025 रोजी पाच, 13 सप्टेंबर 2025 रोजी 5 आणि 13 नोव्हेंबर 2025 च्या लोकअदलातीमध्ये 11 संसार जुळले. चार लोकअदालतींच्या माध्यमातून 25 जोडपी पुन्हा एकत्र आली आहेत.