

अलिबाग : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील 693 प्रशिक्षणार्थी बेरोजगार आहेत. या युवा प्रशिक्षणार्थीना शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेने केली आहे.
सरकारकडे निधी नाही, अनेक विभागात रिक्त पदे आहेत. आम्हाला कायम करा, असा आमचा हट्टाहास नाही परंतु ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत तिथे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सामावून घ्यावे, दीड वर्षापूर्वी आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कॉनट्रॅक्ट पध्दतीने घेेण्यात आले. 6 हजार ते 10 हजार रूपये पगार देऊन आमच्याकडून कामे करू घेण्यात आली. सहा महिन्यांनी आम्हाला काढून टाकण्यात आले. त्यानंतर आंदोलन केल्यामुळे पुन्हा 5 महिने कामावर घेतले.
आम्ही अकरा महिने काम केले आहे. आता आम्ही बेरोजगार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना सध्या रोजगार नाही. त्यांना रोजगार मिळण्यासाठी शासनाने किमान कॉन्ट्रक्ट पध्दतीवर शासकीय सेवेत घ्यावे या मागणीसाठी आम्ही सध्या मुंबईत साखळी उपोषण करत आहोत. जर वेळ आलीच तर तीव्र आंदोलन करणार आहोत, अशी माहिती युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे राज्य सचिव तथा रायगड जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ऋषिकेश पवार यांच्यासह शेकापच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकापचे आलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप युवक आघाडीचे विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते. युवा प्रशिक्षणार्थी सोबत शेकाप आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी यावेळी जाहीर केलेे.
प्रशिक्षणार्थींनी 11 महिन्याचे काम केले असून सरकारच्या निधी अभावी शासकीय भरती होत नाही. प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना सरकारकडून आस्थापनेसाठी निधी उपलब्ध करून प्रशिक्षणार्थींना रोजगार द्यावा, अशी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेची मागणी आहे.
आम्ही अकरा महिने शासकीय सेवेत काम केले. आम्हाला रोजगाराची शाश्वती नाही. शासकीय सेवेत अनेक पदे रिक्त आहेत. निधी नसल्यामुळे भरती केली जात नाही. शासनाने शासकीय आस्थापनेसाठी निधी उपलब्ध्ा करून द्यावा. आम्हाला शासकीय सेवेत कॉन्ट्रक्ट पध्दतीने घ्यावे, अशी आमची मागणी आहे, असे युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश पवार म्हणाले.
नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. शासनाने या सर्वांना पुन्हा नोकरीत घ्यावे. युवा प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला शेकापचा पाठींबा आह, असे शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
महाराष्ट्रात एकूण 1 लाख 34 हजार प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात 693 प्रशिक्षणार्थी आहेत. अलिबाग तालुक्यात 55, मुरुड 50, रोहा 66, माणगांव 55, तळा 11, खालापूर 32, कर्जत 45, पेण 22, महाडमध्ये 33 प्रशिक्षणार्थी आहेत हे सर्व सध्या बेराजगार आहेत.