

महाड : श्रीकृष्ण बाळ
महाड तालुक्यातील कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणीच्या कामावरून सुरू झालेला तणाव अखेर तात्पुरता निवळला आहे. ‘आधी पुनर्वसन, नंतर धरण’ या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास मागे घेण्यात आले असून, तोडगा निघेपर्यंत घळभरणीचे काम बंद ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणीला पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असतानाच सुरुवात करण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी धरण परिसरातच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. शासनाने जबरदस्तीने काम सुरू केल्यास या धरणक्षेत्रात आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा देखील प्रकल्पग्रस्तांनी दिला होता. या आंदोलनाला श्रमिक मुक्ती दल संघटनेचा पाठिंबा होता. आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा देण्यात आली. जवळपास आठवडाभर हे आंदोलन सुरू होते.
आंदोलन तीव्र झाल्यानंतर आता पाटबंधारे विभागाकडून सुरू असलेले घळभरणीचे काम अखेर थांबवण्यात आले असून परिसरातील यंत्रसामग्री व वाहने मागे घेण्यात आली. ‘आधी पुनर्वसन, नंतर धरण’ या मागणीवर ठाम राहिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेमुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, 7 मार्च रोजी सायंकाळी महाडचे उपविभागीय अधिकारी पोपट ओमासे आणि तहसीलदार महेश चितळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेत त्यांच्या स्तरावर सोडवता येणारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच शासन स्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या मागण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येतील, असेही सांगण्यात आले. याशिवाय प्रकल्पग्रस्तांचे मार्गदर्शक डॉ. भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रकल्पग्रस्तांच्या म्हणण्यानुसार सुमारे 65 टक्के लाभार्थ्यांचे पर्यायी जमीन अथवा आर्थिक पॅकेज संदर्भातील प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. हा प्रश्न निकाली निघेपर्यंत घळभरणीच्या कामासाठी पाटबंधारे विभाग धरण क्षेत्रात येणार नाही, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर कोथेरी प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. आंदोलनकर्त्यांनी या लढ्याला विविध स्तरावरून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. विशेषतः माध्यमांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविल्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. दरम्यान, कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास महाड शहरासह परिसरातील सुमारे 11 गावांचा पाणीप्रश्न दीर्घकाळासाठी सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न पूर्णपणे निकाली न लागल्यास हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.