

मुंबई : प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंत असलेल्या कोस्टल रोडचा खर्च तब्बल 2 हजार 220 कोटींनी वाढला आहे. या कामासाठी सातव्यांदा फेरफार सुचवण्यात आला आहे. यात 24 कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली आहे. कोस्टल रोडचा मूळ खर्च 12 हजार 721 कोटी रुपये होता तो 14 हजार 941 कोटी रुपयांवर पोहचला आहे.
कोस्टल रोडचा मूळ खर्च 12 हजार 721 कोटी रुपये इतका होता. त्यानंतर वस्तू व सेवा करांमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे प्रकल्प खर्चात 339 कोटी 32 लाख रुपयांची वाढ झाली. त्यामुळे हा खर्च 13 हजार 60 कोटी रुपयांवर पोहचला. त्यानंतर प्रकल्प खर्चात सातत्याने वाढ होत गेली. 120 मीटर निवड अंतराच्या जलवाहतूक मार्गाच्या कामामुळे दुसऱ्या फेरफारमध्ये प्रकल्प खर्च 13 हजार 983 कोटी रुपयांवर पोहचला. नवीन टेट्रापॉड बसवण्याच्या कामामुळे प्रकल्प खर्चात 46 कोटी 27 लाख रुपये वाढ झाली. त्यामुळे प्रकल्प खर्च 14 हजार 30 कोटी रुपयांवर पोहचला.
हाजी अली येथील वाहनतळ बांधण्याच्या कामामुळे 749 कोटी 29 लाख रुपये इतकी खर्चात वाढ झाली. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च 14 हजार 779 कोटी रुपयांवर पोहचला. बोगद्यातील वायुविजन प्रणालीतील बदलामुळे प्रकल्प खर्चात 30 कोटी 21 लाख रुपये वाढ झाली. त्यामुळे प्रकल्प खर्च 14 हजार 809 कोटीवर पोहचला. आराखड्यामध्ये झालेल्या बदलामुळे सहाव्यांदा प्रकल्प खर्चामध्ये फेरफार करण्यात आला. आराखड्याच्या बदल्यामुळे 107 कोटी रुपये प्रकल्प खर्च वाढला. पुन्हा सातव्यांदा पादचारी अंडरपास आणि दुभाजकाच्या छत अतिरिक्त कामासाठी प्रकल्प खर्चामध्ये 24 कोटी 32 लाख रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आता प्रकल्प खर्च 14 हजार 941 कोटी रुपयेवर पोहचला आहे.
वस्तू व सेवा कर - 339 कोटी 32 लाख
जलवाहतूक मार्गाचे काम -922 कोटी 92 लाख
नवीन टेट्रापॉड - 46 कोटी 27 लाख
हाजी अली वाहनतळ - 749 कोटी 29 लाख
बोगद्यातील वायूविजन - 30 कोटी 21 लाख
आराखड्यातील बदल - 107 कोटी 56 लाख
पादचारी अंडरपास - 24 कोटी 32 लाख