

मुंबई : पारा चाळीशीच्या जवळ गेल्याने भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट आल्याचा इशारा दिला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतही उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, सोमवारी विदर्भातील अकोला येथे 40.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दुपारी 12 ते 4 पर्यंत घराबाहेर पडताना खबरदारी बाळगण्याचा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईशिवाय रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावती आदी जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सोमवारी कमाल तापमान 38.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले आणि उष्णतेची लाट उसळली. सांताक्रूझ वेधशाळेच्या माहितीनुसार, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस होते. तापमानात सातत्याने होणारी वाढ पाहता हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी मुंबई, ठाणे आणि पालघरच्या काही भागात उष्णतेची लाट जाहीर केली. यलो अलर्टमुळे दुपारी 12 ते दुपारी 3 दरम्यान उच्च तापमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यंदाच्या उन्हाळी हंगामाला आता सुरुवात झाली असून, राज्याचा पारा सोमवारी 40 अंशांवर गेला. अकोला येथे 40.9, सोलापूर 40.2, तर पुणे शहराचा पारा 39 अंशांवर गेला होता. सोमवारपासून राज्यातील सर्वच भागांत दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या.