

पाली : शरद निकुंभ
सह्याद्री पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम व आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या ‘गूळाच्या ढेपा’ सुळक्यावर सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई करत साहसी कामगिरी नोंदवली आहे. मॅकमोहन, अमित तोरसकर आणि निलेश कवडे या तिघांनी नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने ‘गूळाची ढेप2’ हा सुळका सर करून गिर्यारोहण क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध केले.
सुधागड किल्ल्याच्या डोंगरसोंडेला लागून, तैलबैला परिसरातून खाली येणाऱ्या धारेवर ‘गूळाच्या ढेपा’ हे चार सुळके उभे आहेत.
सह्याद्रीतील गिर्यारोहकांसाठी हे सुळके कायम आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. यापैकी सुमारे 110 फूट उंचीचा ‘गूळाची ढेप2’ हा सुळका सोप्या श्रेणीतील मार्गाने सर करण्यात आला.गूळाची ढेप2 आणि 3 यांमधील खिंडीतून आरोहणाची सुरुवात करण्यात आली. मार्गात असलेल्या प्रस्तरावर टेप लावून दोर ओवण्यात आला असून माथ्यावर असलेल्या झाडाचा दोर बांधण्यासाठी उपयोग करण्यात आला. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत, तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गिर्यारोहकांनी शिखर गाठले.
या यशस्वी मोहिमेमुळे सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची ओळख अधिक भक्कम झाली असून परिसरातील युवकांमध्ये गिर्यारोहणाविषयी उत्साह निर्माण झाला आहे. सह्याद्रीतील दुर्लक्षित सुळक्यांकडे लक्ष वेधले जाणे ही या मोहिमेची मोठी उपलब्धी मानली जात आहे.
गूळाच्या ढेपा सुळक्यांकडे जाण्याचे प्रमुख मार्ग
तैलबैला मार्गे : तैलबैला पठारावरून तैलबैला सुळके डावीकडे ठेवत सुधागडाकडील कड्याच्या टोकापर्यंत गेल्यानंतर खाली उतरणारी वाट शोधावी लागते. ओढ्यातून उतरून डोंगरधारेवर पोहोचल्यानंतर गूळाची ढेप1 च्या पायथ्याशी जाता येते. ढेप2 व 3 साठी उजवीकडील ओढ्यातून उतरून घळीमार्गे खिंडीत पोहोचावे लागते.
धोंडसे मार्गे : पालीवैतागवाडी रस्त्याने धोंडसे गावापर्यंत सहज पोहोचता येते. धोंडसे गावातून ओढ्याच्या दिशेने चढत सुळक्यांकडे जाता येते. पावसाळ्यानंतर काही काळ ओढ्यात पाणी असल्याने योग्य खबरदारी आवश्यक आहे.
ठाकूरवाडी मार्गे : सुधागडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीतून नदीकाठाने धनगडाच्या दिशेने चालत, जंगलातून वाट काढत गूळाच्या ढेपांच्या पायथ्यापर्यंत जाता येते. ही कामगिरी सह्याद्रीतील साहसी गिर्यारोहण संस्कृतीला नवी दिशा देणारी ठरत आहे.