

पाली ः शरद निकुंभ
पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं ‘अंधारबन’ हे सह्याद्रीतील अनोखं आणि आकर्षक जंगल आजकाल पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण बनलं आहे. दाट झाडं, पायथ्याशी वाहणारे ओढे आणि सतत धुक्यात गुंतलेलं वातावरण यामुळे या जंगलाला ‘निसर्गाच्या शांततेचं स्वर्ग’ असंही संबोधलं जातं. मात्र पर्यटकांची वाढती ये-जा यामुळे या जंगलाला संवर्धनाची गरज असल्याची वनविभागाची चिंता आहे.
जैवविविधतेने समृद्ध अंधारबन जंगलात विविध प्रजातींचे पक्षी दिसून येतात. यात मोर, धनेश, बुलबुल, पपई आणि अनेक दुर्मिळ पक्षी प्रजातींचा समावेश आहे. साप, सरडे, वेगवेगळ्या फुलपाखरांच्या प्रजाती आणि औषधी वनस्पती यांचंही अस्तित्व घनदाट आहे.
पर्यटकांची वाढती गर्दी आणि निसर्गाला धोका सह्याद्रीतील शांतता अनुभवण्यासाठी अनेक तरुण आणि पर्यटक इथे येऊ लागले आहेत. काहीजण नियम मोडून जंगलात कचरा टाकतात, जलप्रवाहात अंघोळ करतात, आणि प्राण्यांच्या अधिवासावर परिणाम करतात. यामुळे वनविभागाने पर्यटकांना जबाबदारीनं वागण्याचं आवाहन केलं आहे.
वनविभागाचे उपाय वनविभाग आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे. ‘अंधारबन स्वच्छता अभियान’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्ग शिक्षण शिबिरे’ आयोजित करण्यात येत आहेत. अंधारबनचा पर्यटन विकास झाला तरीही निसर्गाची शांतता आणि संरचना अबाधित ठेवण्याचं आव्हान सर्वांपुढे आहे.
अंधारबनचे वैशिष्ट्य
अंधारबन हे दाट हिरवेगार जंगल, धबधबे, ओढे आणि ढगांच्या संगतीतले एक अतरंगी साहस आहे. येथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत क्वचितच येतो, म्हणूनच या जंगलाला “अंधारबन“ असे नाव लाभले. दिसायला जरी शांत पण निसर्गाच्या विविध रूपांचे दर्शन येथे होते.
ट्रेकच्या मार्गावरून खाली उतरताना आपण दरीचे निसर्गरम्य दृश्य, धबधबे, गच्च हिरवीगार झाडे, तसेच ताम्हिणी घाटाचे सौंदर्य एकत्र पाहू शकतो. पावसाळ्यात हा ट्रेक अत्यंत सुंदर दिसतो पण त्या काळात काळजी घेणे आवश्यक असते.
विविध वन्यजीवांचे निवासस्थाने
मोर, बुलबुल, लॉलपंखी सारखे पक्षी विविध प्रजातींचे साप, सरडे आणि काचरड्या जंगलातील शंभराहून अधिक विविध वृक्ष आणि औषधी वनस्पती
अंधारबन या नावाच्या वेब साईट वर अगोदर ऑनलाइन बुकिंग करावे लागतेअंधारबन या ठिकाणी जाण्यासाठी पुणे ते ताम्हणी किंवा पाली, कोलाड मार्गे ताम्हणी पर्यंत जाणे. पिंपरी गावाच्या ठिकाणी आपले वाहने उभी करावी लागतात. तेथून पुढे अंधारबन कडे साधारण एक किमी पायी चालत जाऊन चौकीवर आपले बुकिंग दाखविले की वीस पर्यटक चा एक गट करून एक गाईड दिला जातो या ठिकाणी तुम्ही प्लास्टिक चे कोणतीही वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत न्यायची झाल्यास पन्नास रुपये अगोदर डिपॉसिट घेतले जाते, परतीच्या वेळी तुम्ही ती बाटली दाखवून तुमचे पन्नास रुपये परत घेता येतात. कोणत्याही प्रकाराचे मद्य नेण्यास मनाई आहे.
पर्यटन आणि संवर्धन संतुलनाची गरज
अंधारबनचं सौंदर्य अनेकांना भुरळ घालतं, परंतु निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपण्यासाठी जबाबदार पर्यटन तितकंच महत्त्वाचं आहे. स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग आणि पर्यटकांनी एकत्र येऊन संवर्धनाला हातभार लावला तर अंधारबनचं हिरवं, धुक्यातलं वैभव कायम राहू शकेल.
15 किमीचा नैसर्गिक ट्रेक
मुळशी तालुक्यातील पिंपरी गावातून सुरू होणारा हा ट्रेक सुमारे 15 किमी लांबीचा असून, सुधागड तालुक्यातील भिरा धरणाजवळ संपतो. पावसाळ्यात धबधबे, ओढे, ढग आणि हिरवाईचं अनोखं समन्वय पाहायला मिळतो. मात्र या काळात मार्ग अत्यंत घसरडा असल्याने अनुभवी मार्गदर्शकासह जाणं उचित ठरतं.अंधारबन हे केवळ ट्रेकिंग पॉइंट नसून निसर्गाच्या कुशीतलं जिवंत संग्रहालय आहे. याची जपवणूक आणि संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
अंधारबन जंगल आणि ट्रेक मार्ग प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात आहे. हा मार्ग ताम्हिणी घाटातून सुरू होतो आणि भिरा ( जिल्हा) परिसरात संपतो. अंधारबनच्या अंतर्गत खालील तालुक्यांचा समावेश होतो: मुळशी तालुका (जि. पुणे) अंधारबन ट्रेकचा प्रारंभ बिंदू (पिंपरी गाव). सुधागड तालुका (जि. रायगड) ट्रेकचा शेवट भिरा धरणाजवळील भागात होतो.