

ठाणे : दिलीप शिंदे
पक्षांतरावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची थेट गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. दुसरीकडे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेतील १०० नगरसेवकांचे गिफ्ट शिंदे यांना देण्याची घोषणा करून भाजपाला डिवचले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कमळाच्या चिन्हावर उभे राहणार त्यालाच विजयी करा, असे प्रतिउत्तर दिल्याने ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल. उपमुख्यमंत्री शिंदे यांना भाजपश्रेष्ठींकडून झुकते माप देण्याची परंपरा मोडीत निघण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई ही भाजपची, शिवसेनेला ठाणे आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस असे अलिखित गुप्त समझोते महायुतीमध्ये झाले होते. मात्र मुंबईच्या भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनाप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आता कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, भाजप स्वबळावर चालणारा पक्ष असून राज्यात भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यात भाजपच्या रणनीतीत आमूलाग्र बदल होऊ लागले.
सत्ता काबीज करण्यासाठी सर्व प्रकारची रणनीती आखून विरोधी पक्षासह मित्रपक्षातील वजनदार कार्यकर्ते, उमेदवारांच्या हाती कमळ देण्यास सुरुवात झाली. त्यात उल्हासनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपचे नगरसेवक फोडले आणि भाजपला पक्ष विस्ताराची संधी मिळाली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपात प्रवेश दिला.
कट्टर विरोधकाला मित्र बनविल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमधील शिवसेनेचे चार तगड्या नगरसेवकांना भाजपवासी केल्याने शिवसेनेत नाराजीचा विस्फोट झाला. शिवसनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी सेना मंत्र्याची कानउघाडणी करीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कृतीचे समर्थन केले. ते नामदार शिंदे यांना रुचले नाही.
शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ठाणे महापालिकेत १०० नगरसेवक पाठवून एकनाथ शिंदे यांना गिफ्ट देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. यातून शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळाल्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.
हे आवाहन म्हणजे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याचे आदेश असल्याचे म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्षाची भूमिका म्हणजे भाजपचीच भूमिका असल्याने महायुत्ती तुटण्याच्या शक्यतेने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.
आतापर्यंत ठाणे जिल्ह्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कधीच ताठर भूमिका घेतली नव्हती. युतीत कलह नको म्हणून शिंदे यांच्या कलेने भूमिका असायची अशी चर्चा भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या तोंडी असायची. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी विरोधात पवित्रा घेतल्याने शिंदे यांनी थेट दिल्ली गाठून गृहमंत्री शहा यांच्याकडे तक्रार केल्याची चर्चा आहे.